तयारी सिंहस्थाची : वाहनतळ, निवास, रस्त्यांची कामे प्रस्तावित
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यंत्रणांनी तयारी सुरू केली आहे. बांधकाम विभागाने दोन हजार ५२९ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे. त्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कायमस्वरूपी निवासव्यवस्था, रस्ते, तात्पुरते वाहनतळ उभारणी आदी जिल्ह्यातील विविध कामांचा समावेश आहे.
२०२७-२८ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. यंदाच्या कुंभात देश-विदेशातून साधारणत: पाच कोटी भाविक हजेरी लावतील, असा अंदाज आहे. त्यामुळे निरनिराळ्या यंत्रणांनी सिंहस्थाच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गेल्या आठवड्यात संबंधित यंत्रणांची एकत्रित बैठक घेतली. बैठकीत सर्व यंत्रणांना त्यांचे आराखडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि. २ त्यांच्या आराखड्याचे सादरीकरण केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या आराखड्यात जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दोन हजार ३८० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. याव्यतिरिक्त शासकीय विश्रामगृह दुरुस्तीसाठी ६३ कोटी, वाहनतळ, साधुग्राम, पोलिस व भाविकांसाठी तात्पुरते निवाराशेड उभारणे, दवाखाने तसेच दुकानांसाठी ८६ कोटींची गरज भासणार आहे. त्यानुसार विभागाने एकूण दोन हजार ५२९ कोटी रुपयांची विकासकामे आराखड्यात प्रस्तावित केली आहेत.
या रस्त्यांची दुरुस्ती
सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या आराखड्यात विविध महामार्ग व रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार डहाणू-त्र्यंबक-संभाजीनगर रस्ता; नांदगाव-पिंपळगाव-अडसरे-टाकेद रस्ता; वाकी-घोपडगाव- देवळा-टाकेद रस्ता; साकूर फाटा-पिंपळगाव भरपहर रस्ता; खेड (भैरवनाथ मंदिर) ते कळसूबाई मंदिर ते इंदाेर रस्ता; बाळविहीर ते लोहारवाडी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे; इंदोर ते लहान कळसूबाई मंदिर रस्ता, कावनई ते गोंदे व कावनई ते मुकणे रस्ता काँक्रिटीकरण करणे आदी कामे प्रस्तावित केली आहेत.
नूतन विश्रामगृह उभारणी
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील शासकीय विश्रामगृहाजवळ ५० कक्षांचे व त्र्यंबकेश्वर येथे २० कक्षांचे विश्रामगृह उभारले जाणार आहे. इगतपुरीमध्ये १० कक्षांचे नूतन विश्रामगृह बांधण्यासह सध्याच्या विश्रामगृहांच्या दुरुस्तीची कामे केली जातील. याशिवाय पोलिसांसाठी वॉच टॉवर, बॅरिकेडिंग करणे, कावनईचे मंदिर सुशोभीकरण, इगतपुरीच्या कामख्या देवी मंदिराचे सभामंडप बांधकाम व सुशोभीकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत.
हेही वाचा:
Nashik Igatpuri News Update | वैतरणा धरणात बुडालेल्या दोघांचे मृतदेह आढळले
Nashik Water Issue | सिडको परिसरात पाणीबाणी