ससूनच्या कामकाजात ’काळे’बेरे? अधिष्ठाता डॉ. काळे भूमिका घेणार कधी?
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ससून रुग्णालयाच्या कामकाजावर सातत्याने प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. दीड वर्षात पाच अधीक्षकांची नियुक्ती, विद्यार्थिनींचे रॅगिंग प्रकरण, आयसीयूमध्ये उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू आणि आता रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार, अशी एकामागून एक प्रकरणे समोर येत आहेत. अधिष्ठाता या नात्याने डॉ. विनायक काळे यांनी जबाबदारी घेऊन याबाबत वेळोवेळी भूमिका घेणे आणि माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्याकडून सातत्याने घेतल्या जात असलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे कामकाजातच ’काळे’बेरे असल्याची शंका व्यक्त होत आहे.
ललित पाटील प्रकरणामध्ये डॉ. संजीव ठाकूर यांची गच्छंती झाल्यावर डॉ. विनायक काळे यांची अधिष्ठातापदी पुन्हा नेमणूक करण्यात आली. डॉ. काळे अधिष्ठातापदी आल्यापासून कामकाजातील सुसूत्रता आणि सुसंवाद यामध्ये अडचणी येत असल्याचे ससूनमधील कर्मचा-यांचे म्हणणे आहे. कर्मचार्यांना अपमानास्पद वागणूक देणे, वारंवार सुट्टीवर जाणे आणि त्यामुळे अनेक महत्त्वाच्या फाईल प्रलंबित राहणे, ससून रुग्णालयातील विभागप्रमुखांशी सुसंवाद नसणे अशा समस्या निर्माण होत आहेत. ड्रगतस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे डॉ. काळे सांगतात. मात्र, ललित पाटील सुरुवातीला दोनदा ससून रुग्णालयात अॅडमिट झाला, त्यावेळी डॉ. काळे हेच अधिष्ठातापदी होते. कैद्यांचा वॉर्डही डॉ. काळे यांच्या आदेशानेच 16 नंबर वॉर्डमध्ये स्थलांतरित झाला. डॉ. काळे यांनी वेळेवर सह्या न केल्याने औषध खरेदीत विलंब होत असल्याचेही पुढे आले आहे.
काळे आले अन् ससून बदलले
ससूनला मिळणा-या देणगीचे प्रमाण कमी झाले.
पत्रकारांना केबिनमध्ये सोडल्यामुळे कर्मचा-यांना अपमानास्पद वागणूक.
औषध खरेदीत विलंब.
रुग्णालयातील वॉर्डांमध्ये महिन्यातून एखादीच फेरी.
रॅगिंग प्रकरण, उंदीर चावा प्रकरणात कारवाईत तत्परता नाही.
हेही वाचा
बीड : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचे अपहरण; २ कोटींची मागणी
Nashik Water Issue | सिडको परिसरात पाणीबाणी
आयटीआय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून..!