तडका : मनोरंजनाचा धमाका

अजून लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडायचा आहे. त्याच्या आधीच विधानसभा निवडणुकांचे कवित्व सुरू झाले आहे. कोणत्या पक्षांनी किती जागा लढवायच्या, मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण, यावरून लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्याच्या आधीच गहजब सुरू झाला आहे. एका द़ृष्टीने पाहिले तर राजकीय लोक हे क्षितिजापल्याडचेपण पाहू शकतात आणि विधानसभा निवडणुकीचे कॅल्क्युलेशन करायला सहा महिने आधीच सुरुवात करू शकतात.
राज्यापुरते बोलायचे झाले तर 48 जागांसाठी साधारणतः अनेकजण इच्छुक होते आणि त्याच वेळेला किमान 50 हजार लोक विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करत होते. राजकीय पक्षाचे तिकीट विधानसभेला मिळावे यासाठी प्रत्येकाने मतदारसंघात किंवा भावी मतदारसंघात भरपूर प्रचार केला आणि इतरही बर्याच कृती केल्या आहेत. याचा एकमेव उद्देश पक्षश्रेष्ठींनी आपल्याकडे लक्ष द्यावे आणि एकदाचे विधानसभेचे तिकीट मिळावे हाच होता. लोकसभा निवडणूक जवळपास संपल्यात जमा आहे आणि चार तारखेला त्याचा निकाल लागेल आणि त्यानंतर राजकारणामध्ये जो प्रकार सुरू होईल त्याला सुंदोपसुंदी असे म्हणतात आणि ती कशी असते हे पण तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. मजा आहे बुवा तुमची. पाठोपाठच्या निवडणुकांमुळे रोजच्या मनोरंजनाची काही कमीच नाही.
लोकसभेनंतर ज्याच्या मनाप्रमाणे निकाल लागेल, त्याला ईव्हीएमबद्दल काहीही शंका असणार नाही आणि ज्याच्या मनाविरुद्ध निकाल येईल, तो हमखास ईव्हीएमवर खापर फोडणार याविषयी आता आपल्या कोणाच्या मनात शंका उरलेली नाही. एका राजकीय पक्षाने नुकतेच जाहीर केले की, आम्ही 272 चा आकडा ओलांडलेला आहे. हे जाहीर करण्याचा उद्देश उद्या चालून जर 30 ते 40 जागा आल्या तर सर्रास ईव्हीएमचा गैरवापर केला जात आहे, अशी ओरड करायला हे नेते तयार होतात.
अपयशाचा कोणी बाप नसतो असे म्हणतात. अपयशाला राजकारणात बाप नसेल तरी ईव्हीएम ही त्याची आई म्हणता येईल, अशा स्वरूपाची मशिन आहे आणि कारण नसताना अपयशाचे लोकांचे खापर स्वतःच्या डोक्यावर फोडून घेत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळणे किंवा ते न मिळाल्यास बंडखोरी करणे किंवा काही लोक तर सरळ सरळ अपक्ष उभे राहण्याची तयारी करत आहेत. याचे कारण विधानसभा निवडणुकीत कधीही थेट लढती नसतात. त्या चौरंगी, पंचरंगी किंवा या वेळेला षटरंगी पण असू शकतात.
या अशा अनेक उमेदवार उभे राहिलेल्या मतदारसंघांमध्ये अपक्ष म्हणून आपण दोन-अडीच लाख मते मिळवू शकलो तर आपली सीट नक्की निघते, असा प्रत्येकाचा विश्वास असतो. लोकसभा खासदाराला जेवढे ग्लॅमर नसते त्यापेक्षा कितीतरी जास्त ग्लॅमर आमदाराला असते. त्यामुळे बरेचजण लोकसभा निवडणुका लढवण्यास इच्छुक नव्हते. काही लोकांना पक्षाने बळजबरी उभे केले. मोठे मोठे नेते मी राज्यातच बरा आहे असे म्हणत होते. त्यांना नाईलाजाने लोकसभा लढवावी लागलेली आहे. यथावकाश जर ते खासदार झाले तर त्यांची रवानगी केंद्रात झाली आहे हे त्यांनी समजून असले पाहिजे. विधानसभा ही अधिक चुरशीची निवडणूक होणार आहे. याचे कारण म्हणजे तुलनात्मकद़ृष्ट्या विधानसभा मतदारसंघ हा लहान असतो आणि आधीपासूनच तयारी सुरू केल्यामुळे प्राथमिक काम जवळपास सर्व उमेदवारांनी संपवलेले असते. आता केवळ तिकीट मिळवणे एवढेच बाकी आहे.
