कलात्मकतेची छाया

चित्रपट हे तुमच्या-आमच्या कलाजाणिवा प्रगल्भ करणारे प्रभावी माध्यम आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे चित्रपटकलेच्या विकासाच्या द़ृष्टीने जसे महत्त्वाचे व्यासपीठ, तसेच ते जगातील विविध देशांतील समाजवास्तव ठळकपणे समोर ठेवणारे एक माध्यमही. जगद्विख्यात दिग्दर्शक डिसिका यांचा ‘बायसिकल थीव्ज’ आणि रोझेलिनी दिग्दर्शित ‘रोम, ओपन सिटी’ या चित्रपटांनी स्टुडिओच्या कृत्रिम जगात अडकून पडलेल्या चित्रपटाला अवतीभवतीचे धगधगीत वास्तव स्वीकारायला लावले. भारताने 1952 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत भरवल्यापासून 70 वर्षांत देशात अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडले. अशा महोत्सवांत व अन्यत्र स्वीडिश दिग्दर्शक इंगमार बर्मन यांनी व्यक्तिवादी चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. या तरल कविवृत्तीच्या दिग्दर्शकाने स्त्रीच्या अंतर्मनाचा सातत्याने वेध घेतला. परंपरेच्या व पुरुषी वर्चस्वाच्या आणि स्वतःभोवती आवळून घेतलेल्या बाईपणाच्या पिंजर्यात शतकानुशतके घुसमटणार्या स्त्री दुःखाला चित्रपटांतून वाचा फोडली.
बर्गमनचा प्रत्येक चित्रपट एखाद्या पेंटिंगप्रमाणे भासतो, असे सांगून फ्रेंच दिग्दर्शक फ्रान्स्वा त्रुफाँ यांनी त्यांच्या क्लोजअप तंत्राचा विशेषत्वाने उल्लेख केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर, कान महोत्सवात पायल कपाडिया यांच्या ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाने ग्रां.प्री. पुरस्कार मिळवण्याची करामत करून दाखवली. पायल या पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थिनी. याच इन्स्टिट्यूटचे चिदानंद नाईक यांच्या ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो’ या चित्रपटात तेथे उत्तम लघुपटाचे बक्षीस मिळाले असून मैसम अली यांच्या ‘इन रिट्रीट’ हा चित्रपटही कान्समध्ये प्रदर्शित झाला. एफटीआयआयचे प्रमुख म्हणून महाभारत या दूरचित्रवाणी मालिकेतील धर्मराजाची भूमिका करणार्या गजेंद्र चौहान यांची नेमणूक झाली होती.
गजेंद्र यांच्या एकूण धोरणाविरोधात इन्स्टिट्यूटमध्ये आंदोलन झाले होते आणि त्यामध्ये पायल यांचाही सहभाग होता. द लास्ट मँगो बिफोर द मान्सून, अँड व्हॉट इज द समर सेंइंग, द नाईट ऑफ नोईंग नथिंग वगैरे चित्रपट त्यांनी बनवले. आंदोलनाचे नेतृत्व केल्याने त्यांची शिष्यवृत्तीही थांबवण्यात आली. त्यानंतर त्यांनी या आंदोलनावरील माहितीपटही प्रदर्शित केला. एफटीआयआयमधील ते आंदोलन कोणाला मान्य असो अथवा नसो, परंतु महत्त्वाच्या प्रश्नांवर भूमिका घेऊन एखादी चळवळ उभारणे, तिचे नेतृत्व स्वीकारणे यामधून आयुष्याचा अनुभव समृद्ध होत असतो. कोणत्याही कलावंताला आपल्या कलेत या अनुभवाचा उपयोग होत असतो. पायल यांचा यंदाचा पुरस्कारप्राप्त चित्रपट हा मुंबईत आलेल्या परिचारिकांच्या आयुष्यावर आधारित आहे. तीन अतिशय वेगवेगळा स्वभाव असलेल्या स्त्रियांचा प्रवास चित्रपटातून उलगडून दाखवण्यात आला आहे.
एकमेकांबद्दलचे प्रेम, सहानुभूती आणि आस्था यातून स्त्रियांची एकजूट होऊ शकते, हे त्यांनी या चित्रपटातून मांडले. तीन वर्षांपूर्वी ‘नाईट ऑफ नोईंग नथिंग’ या पायल यांच्या पहिल्याच माहितीपटाने कानमध्ये गोल्डन आय पुरस्कार जिंकला होता. हा माहितीपट पुण्यातील एफटीआयआयमध्ये झालेल्या आंदोलनावर आधारित होता. त्यांच्या ग्रां.प्री. पुरस्कारप्राप्त ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाईट’ चित्रपटात मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांची महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या आईची साडी नेसून व नथ घालून छाया कानमधील रेड कार्पेटवर अवतरल्या, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. नागराज मंजुळे यांच्या सैराट, फँड्री आणि झुंड या चित्रपटांतील छायाच्या भूमिका गाजल्या. आपल्या मातीतल्या आपल्या माणसांची गोष्ट आपल्या वाट्याला येते, तेव्हा तिच्यात जीव ओतून टाकलेला एक क्षण जेव्हा कान फिल्म फेस्टिव्हल उजळून टाकतो, तेव्हा आपल्या मागच्या सगळ्या प्रवासातल्या सगळ्या सिनेमांची – लेखकांची आणि दिग्दर्शकांची आठवण येते, अशी सार्थ प्रतिक्रिया छाया कदम यांनी व्यक्त केली.
अनेक वर्षांपूर्वी छायाने अरुण नलावडे दिग्दर्शित ‘बाईमाणूस’ चित्रपटात आदिवासी स्त्रीची भूमिकाही संयतपणे साकारली. ‘न्यूड’सारख्या चित्रपटातील भूमिका स्वीकारण्याचे धाडसही छाया यांनी दाखवले आणि सध्या गाजत असलेल्या ‘लापता लेडीज’मधून हिंदी प्रेक्षकांवरही त्यांच्या अभिनयाची छाया पडली. ‘लापता लेडीज’मध्ये त्यांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखेच्या तोंडी असलेल्या पुढील वाक्यातून समग्र स्त्रीबद्दलचा समाजाचा वास्तव द़ृष्टिकोन स्पष्ट होतो. या देशातील स्त्रियांसोबत कित्येक शतकांपासून एक फ्रॉड होत आला आहे. हा फ्रॉड म्हणजे भले घर की बहूबेटी.
या बहूबेटींनी आई-वडिलांची आणि नंतर सासरच्यांची परवानगी घेऊनच सर्व गोष्टी कराव्यात आणि कायम पडती भूमिका स्वीकारावी, अशी अपेक्षा असते. छाया यांचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व मात्र बंडखोर व करारी आहे. ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाईट’ चित्रपटामध्ये इस्पितळातील कुकचे काम करणारी पार्वती म्हणजे छाया कदम. छाया यांना या भूमिकेचा आत्माच सापडला आहे. त्यांच्या कलेचा प्रारंभ रंगभूमीवरून झाला. वामन केंद्रेंच्या ‘झुलवा’मध्ये त्यांनी चमक दाखवली. मी सिंधुताई सपकाळ, बाबू बँडबाजा, कुणी घर देता का घर, सिंघम रिटर्न्स, बुधिया सिंग – बॉर्न टू रन अशा चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांची नोंद प्रेक्षकांनी घेतली.
स्मिता पाटील, रोहिणी हट्टंगडी यांसारख्या मराठी अभिनेत्रींनी हिंदी चित्रपट जगतात मुद्रा कोरून ठेवली आहे. आंतरराष्ट्रीय जगतातही त्यांनी छाप सोडली आहे. मानवी संवेदनेला हाक घालणार्या भूमिकांची त्यांची निवडही चांगली असते. 1946 मध्ये चेतन आनंद दिग्दर्शित ‘नीचा नगर’ या चित्रपटास पहिल्या कान चित्रपट महोत्सवात ग्रां.प्री. मिळाले होते. पायलचा हा चित्रपट भारत, फ्रान्स, लक्झेम्बर्ग, नेदरलंड आणि इटली येथील कंपन्यांनी मिळून निर्माण केला आहे. सत्यजित रे यांना ‘पाथेर पाँचाली’ बनवताना निधीची चणचण जाणवली होती. त्यावेळी त्यांना पश्चिम बंगाल सरकारने मदत केली होती. आता मात्र वेगळ्या वाटेवरच्या सिनेमांना कंपन्यांचे भांडवल मिळत असून त्यातून सृजनाच्या नव्या नव्या ऊर्मींना प्रोत्साहनच मिळेल असे वाटते.
