धाराशिवमध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा: मधुकरराव चव्हाण

तुळजापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा: धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत दिली पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आज (दि.२८) पत्रकार परिषदेत दिला.
वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे या वर्षातील ही दुसरी नुकसान भरपाई देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. परंतु प्रशासनाचे कामकाज लक्षात घेता शेतकऱ्याला मदत मिळेल की, नाही याबद्दल शंका आहे. कारण यापूर्वीची पिक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्याला मिळालेली नाही. केवळ अग्रीम दिली आहे. मात्र, उर्वरित 75 टक्के रक्कम आज पर्यंत शेतकऱ्याला का दिली नाही? असा सवाल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.
गाव पातळीवर पंचनामे करण्याचे काम 24 तासांत पूर्ण झाले पाहिजे. पुढच्या 24 तासांमध्ये शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, अन्यथा आपण शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला.
वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे ग्रामीण पत्र्याची घरे व शेतकऱ्याचे गोठे पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत शेकडो शेतकऱ्याचे झालेले नुकसान पंचनामे करण्यासाठी अद्याप महसुली यंत्रणा पोहोचलेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तुळजापूर तालुक्यात द्राक्ष, केळी, आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदफळ येथील शेतकरी रवी कापसे यांचे दीड एकर केळीच्या पिकाचे सरासरी सहा लाख रुपये नुकसान झाले आहे. पिंपळा येथील शेतकरी दत्तात्रय डांगे यांचा तीन एकर चुका भाजीचे नुकसान झालेले आहे.
वीजपुरवठा खंडित झाला आहे. शेकडो पोल कोसळले आहेत, ग्रामीण भागातील वीजपुरवठा अद्याप सुरू झालेला नाही. शेतातील पत्र्याचे शेड आणि जनावरांचे गोठ्यांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्या. देण्याची मागणी त्यांनी केली. याप्रसंगी अमर मगर, रणजीत इंगळे, सुनील रोचकरी, आनंद जगताप, बबनराव जाधव आदी उपस्थित होते.
हेही वाचा
धाराशिव: सांगवी येथे पत्र्यावरील दगड डोक्यात पडून वृद्धाचा जागीच मृत्यू
धाराशिव: येरमाळा येथे वादळी वाऱ्याने पत्रे उडाले, लाखाेंचे नुकसान
धाराशिव : रत्नापूरमध्ये भरदिवसा घराचे कुलूप तोडून सोने-चांदीसह दागिन्यांवर डल्ला
