कोल्हापूर: इंचनाळमध्ये भरदिवसा घरफोडी; १९ तोळ्याचे दागिने लंपास

ऐनापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथे इंचनाळ-बेळगुंदी मुख्य रहदारीच्या रस्त्यालगत राहत असलेल्या दत्तात्रय बाबुराव दळवी व त्यांचे बंधू संभाजी बाबुराव दळवी या दोघा भावांच्या घरात मंगळवारी (दि.२८) भर दुपारी चोरी झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, घरी कोण नसलेले पाहून घराचे कुलूप तोडून दत्तात्रय दळवी यांच्या घरातील दहा तोळे सोने व रोख १ लाख रुपये व त्यांच्याच शेजारी राहत असलेले संभाजी दळवी यांच्याही घराचे कडी तोडून कपाटातील ९ तोळे सोने व ४७ हजार रोख रक्कम अशी एकूण १९ तोळे सोने व १ लाख ४७ हजार रुपयांवर चोरट्यांनी भर दिवसा डल्ला मारला.
या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. दोघे भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. तर घरातील महिला जवळच असलेल्या लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. ठसेतज्ञ व श्वानपथकालाही याठिकाणी बोलावण्यात आले आहे.
हेही वाचा
कोल्हापूर : अंबप येथे दोन दारू अड्ड्यावर छापे; दोघांना अटक
कोल्हापूर : डोक्यात कुदळ घालून जन्मदात्या आईचा खून; मुलाला अटक
कोल्हापूर : राजेंद्रनगरात 10 वाहनांची तोडफोड; दगडफेक करत तलवारी नाचवल्या
