धुळे जिल्ह्यात 50 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट,

धुळे Bharat Live News Media वृत्तसेवा– जागतिक तापमानातील वाढ, हवामानातील बदल, उष्णतेची दाहकता आणि तीव्रता कमी करुन पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने धुळे जिल्ह्यात 50 लक्ष वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याकरीता सर्व विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ देण्यात आले असून त्यानुसार सर्व विभागांनी वृक्ष लागवडीचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्यात.
50 लक्ष वृक्ष लागवड कार्यकमातंर्गत नवीन नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपवनसंरक्षक नितिनकुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीनकुमार मुंडावरे, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ, सर्व तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना –
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, धुळे जिल्ह्यात 25 टक्के क्षेत्र वनाखाली आहे. वृक्ष हे वातावरणात पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. याचे महत्व लक्षात घेऊन धुळे जिल्ह्यात यावर्षी पावसाळयात 50 लक्ष वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा अदांज घेवून प्रत्येक विभागास देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी नियोजन करावेत. महानगर पालिका क्षेत्र, नगरपंचायत क्षेत्र, ग्रामपंचायत क्षेत्रातील मोकळ्या जागा, रस्त्याच्या दुतर्फा, शाळा, महाविद्यालय, टेकडयांच्या ठिकाणी तसेच वन विभागांच्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात यावी. ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात वृक्ष लागवडीचे संरक्षण व संगोपन करण्याची जबाबदारी ही बिहार पॅटर्न नुसार 200 रोपांच्या एक घटकाचे संगोपन करण्याची जबाबदारी 4 कुटूंबास द्यावी, रोपांची संख्या कमी जास्त असल्यास त्याचे समान वाटप सर्व घटकांमध्ये करण्यात यावेत. शालेय शिक्षण विभागाने एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम अकोला पॅटर्न म्हणून जिल्ह्यात राबवावा. येत्या वर्षात जिल्ह्यात 2500 हेक्टर क्षेत्रावर बांबु लागवडीचे उद्दिष्टे असून त्याअनुषंगाने संबंधित विभागाने बांबु लागवडीचे नियेाजन करावे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मियाबाकी पद्धतीने वृक्ष लागवड करावी. आदिवासी विकास विभागाने सर्व आश्रमशाळा परिसरात तर विद्युत विभागाने सबस्टेशन, गायरान जमिनीवर वृक्ष लागवड करावी. वृक्ष लागवडीचे ठिकाण निश्चित करुन त्याचा अहवाल या आठवड्यात सर्व विभागांनी द्यावा. तसेच वृक्षारोपणासाठी विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी स्क्षूम नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
उपजिल्हाधिकारी (रोहयो) मुंडावरे यांनी यावेळी सर्व विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ट, उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेले नियोजन, रोपांची उपलब्धता आदिंबाबत बैठकीत माहिती दिली.
हेही वाचा –
केजरीवालांना धक्का, याचिकेवर तत्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
10th Result: महापालिका शाळांचा निकाल 95.36 टक्के
उत्तर कोरियाचे रॉकेट झाले फुस्स…; जपान म्हणाले ‘हे’ जगासाठी धोकादायक
