Nashik: पाचशेच्या ३० बनावट नोटा जप्त; अंबड पोलिसांची कारवाई
सिडको, नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले. पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली असून, इतर फरार आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली आहेत. अशोक अण्णा पगार (४५, रा. मेंढी, ता. सिन्नर) असे अटक झालेल्या संशयिताचे नाव आहे.
या बाबत माहिती अशी, सिडकोतील माऊली लॉन्स येथे बनावट नोटा विक्री करणारी टोळी आली असून त्यांच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली. त्यानुसार या परिसरात सापळा रचून संशयित अशोक पगार याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ३० बनावट नोटा मिळून आल्यात. यावेळी त्याच्या समवेत असलेले दोन ते तीन जण फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडे अजूनही बनावट नोटा असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. संशयितांनी नाशिकमधील एका लॉजवर तीन ते चार नोटांवरील क्रमांकावरुन, बनावट नोटा प्रिंटरद्वारे तयार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार पोलिस उपायुक्त मोनिका राऊत व सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा:
उसका रथ आज भी श्रीकृष्ण ही चलाते है!, गौतम गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल
सहा वर्षांचा ‘गुगल बॉय’ देतो दोन हजार प्रश्नांची उत्तरे