विश्वचषकाच्या रणभूमीतून- प्रतिस्पर्धी तोच, पण उमेद नवी

विश्वचषकाच्या रणभूमीतून- प्रतिस्पर्धी तोच, पण उमेद नवी

निमिष पाटगावकर

पुन्हा विश्वचषक, पुन्हा उपांत्य फेरी आणि पुन्हा तोच प्रतिस्पर्धी. क्रिकेटची काय कमाल आहे! चार वर्षांनी आपण पुन्हा त्याच टप्प्यावर आलो आहोत. न्यूझीलंडशी (ICC Cricket World Cup 2023) उपांत्य सामना म्हटले की आपले अचपळ मन जे विसरायचा प्रयत्न करत असते तेच पुन्हा पुन्हा आठवत बसते. अशा वेळी एकच गोष्ट मनाला सांगायची ती म्हणजे क्रिकेटमध्ये सामना जिंकायला इतिहास मदतीला नसतो तर कामगिरी हेच एकमेव कारण असते. 2015 आणि 2019 या चार वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. या विश्वचषकातील आपली कामगिरी बघता आज कुठच्याही प्रतिस्पर्ध्याला सामोरे जायला आपण जय्यत तयार आहोत. मँचेस्टर आणि मुंबई दोन्ही एकेकाळच्या सुती कापडाच्या बाजारपेठा, पण भारतीय संघाचा विचार केला तर 2019 पेक्षा आपल्या संघाच्या वस्त्राची वीण 2023 ला सुंदर बसली आहे. तेव्हा काही धागेच मजबूत होते, चौथ्या क्रमांकाच्या खाचेत धागा धड बसलाच नव्हता, पण आता तसे नाही. एक ते अकराच काय वेळप्रसंगी राखीव धागेही सक्षम आहेत. तेव्हा या वस्त्रातून विजयाचा ध्वज निर्माण व्हायची अपेक्षा आपण नक्कीच ठेवू शकतो.
न्यूझीलंडचा या विश्वचषकातील प्रवास बघितला तर सलग चार विजय मग सलग चार पराभव आणि शेवटच्या जीवन-मरणाच्या सामन्यात विजय. केन विल्यम्सनच्या अनुपस्थित टॉम लॅथमने संघाचे नेतृत्व चांगले केले आणि महत्त्वाच्या सामन्यात त्यांनी विल्यम्सनला खेळवले. उपांत्य फेरीत अर्थातच विल्यम्सन नेतृत्व करेल तेव्हा भारताचा प्रमुख सामना आहे तो विल्यम्सनच्या धूर्त नेतृत्वाचा. भारताच्या फलंदाजांना भारतीय हवामानात खेळताना तो आपले गोलंदाज कसे वापरतो यावर सामन्याचा कल ठरेल. भारताची रणनीती आता स्पष्ट झाली आहे. रोहित शर्मा आणि गिल न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजांविरुद्ध पहिल्या पॉवर प्लेमध्ये आक्रमक खेळवून सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचा प्रयत्न करणार. वानखेडेवर या विश्वचषकात पहिली फलंदाजी करणार्‍या संघाची सरासरी धावसंख्या साडेतीनशे आहे तर दुसरी फलंदाजी करणार्‍या संघाची सरासरी 190 आहे. जसे पहिल्या सत्रात पहिल्या पॉवर प्लेमध्ये जलदगती गोलंदाजांना मदत मिळते तसेच दुसर्‍या डावात प्रकाशझोतात नवा चेंडू चांगला स्विंग आणि सिम होतो तेव्हा दोन्ही संघांसाठी पहिली पंधरा षटके फार महत्त्वाची आहेत. (ICC Cricket World Cup 2023)
या विश्वचषकात ट्रेंट बोल्ट विशेष यशस्वी ठरलेला नाही. 9 सामन्यांत त्याने 32 च्या सरासरीने आणि 5 च्या इकॉनॉमी रेटने फक्त 13 बळी मिळवले आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळायचा त्याचा अनुभव त्याच्या कामाला येईल, पण बोल्ट हे शर्मा-गिल यांचे पहिले टार्गेट असेल. न्यूझीलंडच्या चमूत हेन्रीच्या ऐवजी समावेश केलेला कायले जेमिसन हा सर्वात खतरनाक असू शकतो. त्याच्या 6 फूट 8 इंच उंचीने तो कुठच्याही खेळपट्टीवर बाऊन्स मिळवू शकतो. न्यूझीलंडची पहिली गोलंदाजी असेल तर वानखेडेची खेळपट्टीच्या सुरुवातीच्या टणकपणाचा फायदा उठवायची क्षमता त्याच्यात नक्कीच आहे. साऊदी आणि फर्ग्युसन गुड लेंग्थच्या पट्ट्यातून चेंडू आऊटस्विंग करून आपल्या सर्व उजच्या हाताच्या फलंदाजांना सतावू शकतात, पण चेंडू जुना झाला की वानखेडेवर त्यांना खेळायला आपल्या फलंदाजांना अडचण यायला नको. न्यूझीलंडच्या गोलंदाजात फक्त मिशेल सँटेनर हा एकच गोलंदाज या विश्वचषकात सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दहा स्थानात आहे. न्यूझीलंडच्या या पाच विजय आणि चार पराजयाच्या कामगिरीचा हाच आरसा आहे.
न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याचे खरे कलाकार आहेत ते रचिन रवींद्र, कॉनवे आणि डॅरेल मिचेल. न्यूझीलंडच्या चार पराभवात भारताविरुद्ध आणि द. आफ्रिकेविरुद्ध कॉनवे लवकर बाद झाला. शेवटच्या दोन सामन्यांत विल यंगला सूर न गवसल्याने त्याला वगळून अखेर रचिन रवींद्रला सलामीला यायला लागले. न्यूझीलंडची फलंदाजी हे तीन प्रमुख फलंदाज आणि आता विल्यम्सन या चार प्रमुख खांबावर उभी असली तर तुलनेत भारताची फलंदाजी जास्त मजबूत आहे. सातव्या क्रमांकावरचा जडेजाही आपला मॅचविनर होऊ शकतो.
भारतासाठी या सामन्यात विजयाची त्रिसूत्री असेल ती म्हणजे फलंदाजी करताना पहिले सूत्र म्हणजे पॉवर प्लेमध्ये आपल्या या विश्वचषकातील 67 च्या सरासरीपेक्षा थोड्या कमी धावा झाल्या तरी विकेटस् न गमावणे, दुसरे रचिन रवींद्र, कॉनवे आणि मिचेल यांना स्वस्तात बाद करणे आणि तिसरे सर्वात महत्त्वाचे सूत्र म्हणजे मुक्तपणे खेळणे. भारतात विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा सामना करोडो लोकांच्या अपेक्षेत खेळताना संघाने कुठच्याही अपेक्षांचे आणि आठवणींचे दडपण न घेता खेळले पाहिजे. आपल्या अर्ध्या फलंदाजीचे म्हणजे रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांचे हे घरचे मैदान आहे. या मुंबईकरांनी घरच्या मैदानावर खेळताना दडपण न घेता खुलून खेळले पाहिजे. रोहित शर्माला या विश्वचषकातील त्याचा अ‍ॅप्रोच इथे थोडा बदलावा लागेल. झटपट चाळीस-पन्नास धावा करून पुढच्या फलंदाजीला पाया रचून देण्यापेक्षा त्याने स्वतः जास्तीत जास्त षटके खेळली पाहिजेत.
इथल्या छोट्या सीमारेषेचा फायदा त्यांच्या इतका जास्त चांगला दुसरा कुणी घेऊ शकणार नाही. गरवारे एंडकडून फलंदाजी करताना स्लीपच्या डोक्यावरून सर्वात छोट्या सीमारेषेवर षटकार कसे मिळवायचे याचा सराव सूर्याला उत्तम आहे. श्रेयस अय्यरने बंगळूरला आपले हात साफ करून घेतले आहेत. एक सँटनेरला सांभाळले तर ईश सोधी, ग्लेन फिलिप्स वगैरे फिरकीपटू भारतीय फटकेबाजीला वेसण घालणे कठीण आहे. भारतीय गोलंदाजीत सर्व काही सध्या उत्तम आहे, पण एकच गोष्ट खटकणारी आहे ती म्हणजे सहाव्या गोलंदाजांचा अभाव. (cricket world cup)
न्यूझीलंड यासाठी पाचवा गोलंदाज टार्गेट करणार तो कोण तर उत्तर जडेजा किंवा कुलदीपपाशी येऊन थांबते. न्यूझीलंडच्या फलदांजीत तीन डावखुरे फलंदाज असल्याने जडेजावर ते आक्रमण करण्याचा धोका जास्त आहे. विश्वचषक ही अशी स्पर्धा आहे ज्याच्या साखळी सामन्यात मोजकेच यश मिळवूनही विश्वचषक जिंकता येतो. भारताने 9-0 तर न्यूझीलंड 5-4 या साखळी सामन्यातील विजयाच्या स्कोअरने बुधवारी एकाच पातळीवर येऊन पोहोचले आहेत. साखळी सामन्यातील यशाचे महत्त्व आता फक्त आत्मविश्वासापुरते उरले आहे. ज्या संघाचे महत्त्वाचे खेळाडू या दोन महत्त्वाच्या सामन्यात आपला खेळ उंचावतात तेच विश्वचषक घेऊन जातात. क्रिकेटमध्ये तसेही प्रत्येक सामना हा नवा असतो तेव्हा भारताने बुधवारी जरी 2019 च्या विश्वचषकाचाच उपांत्य सामन्याचा प्रतिस्पर्धी असला तरी सर्व अपेक्षांचे ओझे, आठवणी दूर करून 2023 च्या नव्या उमेदीने खेळले पाहिजे.
The post विश्वचषकाच्या रणभूमीतून- प्रतिस्पर्धी तोच, पण उमेद नवी appeared first on पुढारी.

पुन्हा विश्वचषक, पुन्हा उपांत्य फेरी आणि पुन्हा तोच प्रतिस्पर्धी. क्रिकेटची काय कमाल आहे! चार वर्षांनी आपण पुन्हा त्याच टप्प्यावर आलो आहोत. न्यूझीलंडशी (ICC Cricket World Cup 2023) उपांत्य सामना म्हटले की आपले अचपळ मन जे विसरायचा प्रयत्न करत असते तेच पुन्हा पुन्हा आठवत बसते. अशा वेळी एकच गोष्ट मनाला सांगायची ती म्हणजे क्रिकेटमध्ये सामना जिंकायला …

The post विश्वचषकाच्या रणभूमीतून- प्रतिस्पर्धी तोच, पण उमेद नवी appeared first on पुढारी.

Go to Source