भारत-व्हिएतनाम सहकार्याचे नवयुग
प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर
स्वतंत्र व्हिएतनामला चीनपासून धोका आहे आणि अमेरिकेच्या वर्चस्वाचे भयही आहे. त्यामुळे व्हिएतनाम तटस्थ देशाचा नेता म्हणून भारताकडे विश्वासाने पाहत आहे. अलीकडेच भारत व व्हिएतनाम या देशांनी नौदल क्षेत्रात सहकार्य करून संयुक्त सराव मोहीम यशस्वी केली. खरे तर 2016 पासून भारत आणि व्हिएतनामने अशा प्रकारच्या संरक्षण करारांना प्राधान्य दिले आणि विशेषतः नौदल क्षेत्रातील या सहकार्यामुळे हिंद प्रशांत क्षेत्रातील भारताचे सामर्थ्य वाढले आहे.
व्हिएत हा शब्द चिनी लोकांनी स्थानिक वंशाच्या लोकांना केलेल्या उल्लेखावरून बनला आहे. व्हिएतनामच्या उत्तरेला चीन आणि पश्चिमेला लाओस व कंबोडिया यांच्या जमिनीवरून सीमा आहेत. थायलंडच्या आखातातून आणि चिनी समुद्रमार्गे फिलिपाईन्स, इंडोनेशिया व मलेशियाच्या सागरी सीमा सामायिक आहेत. हानोई हे सर्वात मोठे शहर आता हो ची मीन सिटी म्हणून ओळखले जाते. पूर्वी त्याला सायगॉन, असेही म्हटले जात असे. व्हिएतनामचे समाजवादी प्रजासत्ताक उत्तर व दक्षिणेच्या एकीकरणातून बनले आहे. 1976 मध्ये ऐक्यबद्ध झालेल्या या देशाच्या उत्तरेवर चीन व रशियाचा, तर दक्षिणेवर अमेरिकेचा प्रभाव होता.
सध्या या देशापुढे उच्च पातळीवरील भ-ष्टाचार, हवामान बदलाच्या समस्या आणि सुरक्षा व मानवी हक्क हे प्रश्न आहेत. 1954 मध्ये व्हिएतनामने अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली. 1975 मध्ये अमेरिकेवर विजय मिळविल्यानंतर उत्तर व्हिएतनामचे वर्चस्व दक्षिणेने मान्य केले व व्हिएतनामचे एकीकरण झाले. हो ची मीन यांनी व्हिएतनामला सामर्थ्य प्राप्त करून दिले. 21 व्या शतकातील बदलत्या जागतिक राजकारणात चीन व अमेरिकेच्या प्रभावापासून मुक्त होऊन भारतासारख्या विकसनशील देशाशी व्हिएतनाम मैत्री करू इच्छित आहे. व्हिएतनामचा विकासदर 8 टक्के असून, शेती, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, उद्योग, शिक्षण या क्षेत्रांत तो मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्याला भारताची मदत अपेक्षित आहे.
नैसर्गिक साधनसामग्री, प्राचीन कलास्थापत्यामुळे हा देश समृद्ध पर्यटनस्थळ बनला आहे. व्हिएतनाम हा देश फ्रेंच इंडो चीनचा एक प्रमुख भाग आहे. आग्नेय आशियातील लाओस, कंबोडिया व व्हिएतनाम या तीन देशांना फ्रेंच इंडो चायना असे म्हणतात. येथे प्राचीन काळात भारतीय संस्कृतीचा प्रभाव होता. त्याची साक्ष तेथील हिंदू व बौद्ध मंदिरांवरून पटते. प्राचीन काळात कंबुज ऋषींनी कंबोदिया हा देश वसविला. त्याला कंबुज द्विप असे म्हटले जात असे. त्याचाच व्हिएतनाम हा एक भाग. शीतयुद्ध काळात उत्तर व दक्षिण व्हिएतनाम अशी विभागणी झाली. अमेरिकेने रशिया व चीनला विरोध म्हणून व्हिएतनामची नाकेबंदी केली; परंतु हो ची मीन यांच्या नेतृत्वाखाली व्हिएतनामने स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि अखेर अमेरिकेला 1973 मध्ये माघार घ्यावी लागली. त्यानंतर उत्तर व दक्षिण व्हिएतनामचे एकीकरण होऊन व्हिएतनाम या स्वतंत्र देशाचा जन्म झाला.
काही दिवसांपूर्वी भारतीय नौदलाचे जहाज किल्तान हे व्हिएतनाममधील बंदर कॅम रान येथे पोहोचले आणि एका नव्या शक्ती सहकार्याची प्रचिती आली. कॅम रान बंदरात भारतीय जहाजाचे आगमन म्हणजे भारत-व्हिएतनाममधील संरक्षण सहकार्याचे एक नवे शिखर म्हटले पाहिजे. भारतीय नौदलाच्या पूर्वेकडील ऑपरेशनल डिप्लॉयमेंटचा हा एक महत्त्वाचा टप्पा होय. या आरमारी सहकार्यामुळे दोन्ही देशांतील मैत्री, दीर्घकालीन संबंध आणि संरक्षण सहकार्यामध्ये एक भक्कम पाऊल टाकले गेले आहे.
आताचा नवा संरक्षण करार म्हणजे सर्वोत्तम विकासाची व सुरक्षेची भागीदारी होय. दक्षिण चीन समुद्रात भारत आणि व्हिएतनामच्या घट्ट मैत्रीमुळे व सहकार्यामुळे एक नवे स्थैर्य प्रस्थापित होण्यास मदत लाभणार आहे. आयएनएस किल्तान हे स्वदेशी बनावटीचे कॉर्व्हेट आहे. युद्धनौका म्हणून त्याचे स्वतंत्र महत्त्व आहे. आयएनएस किल्तान हे 4 पी 28 अँटी-सबमरीन वॉरफेअर तंत्रावर आधारलेले आहे आणि भारताच्या ताफ्यातील कॉर्व्हेटस्मध्ये तिसरे महत्त्वाचे संरक्षण कवच आहे. किल्तानची भेट म्हणजे दोन्ही देशांतील परस्पर नाविक सहकार्याचे नवयुग आहे असेच म्हणावे लागेल.
भारत-व्हिएतनाम मैत्रीचा सेतू म्हणजे भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट’ या धोरणाचा पुरस्कार करणारे आहे. दहा वर्षांपूर्वी केवळ ‘लूक ईस्ट’ असे म्हटले जात असे; पण आता मोदी सरकारने ‘अॅक्ट ईस्ट’ हे धोरण ठरविले आणि त्या द़ृष्टीने पावले टाकली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ‘मुद्रा भद्राय राजते’ ही नौदलाने ब-ीदवाक्य म्हणून स्वीकारली आणि तेव्हापासून नौदल प्रगतीच्या नव्या वाटा पादाक्रांत करत आहे. व्हिएतनामच्या समुद्रात आता भारताचे किल्तान ठसठशीत कार्य करण्यासाठी पुढे सरसावले आहे, ही प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे. संरक्षण क्षेत्रात भारताने स्वतः सिद्धता तर गाठलीच आहे, शिवाय अनेक नवस्वतंत्र राष्ट्रांना बड्या राष्ट्रांच्या सागरी स्पर्धेपासून मुक्त करण्यासाठी भारत एक पाऊल पुढे टाकत आहे.
भारताचे आरमार हे आज जगातील तिसरे महत्त्वाचे आरमार आहे. अमेरिका आणि चीन यांच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळलेल्या अनेक आग्नेय आशियाई देशांना भारतामुळे वाटणारी सुरक्षा व स्थैर्य महत्त्वाचे आहे. आग्नेय आशियातील अमेरिकेच्या प्रभुत्वाला ओहोटी लागल्यानंतर त्याची जागा घेण्याचा प्रयत्न लाल चीनने केला व करीत आहे; पण चीनविषयी व्हिएतनामला विश्वास वाटत नाही, जो भारताविषयी वाटतो. हे लक्षात घेऊन भारताने गेल्या 10 वर्षांत दोन्ही देशांत सहकार्याला भरपूर वाव आहे. या संरक्षण करारामुळे सर्व क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी नवी पावले टाकली जात आहेत.