रोहितसह दहा भारतीय खेळाडू अमेरिकेत दाखल
न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : कर्णधार रोहित शर्मासह 10 भारतीय खेळाडू आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. फलंदाजीतील भक्कम आधारस्तंभ विराट कोहली व उपकर्णधार हार्दिक पंड्या मात्र या पहिल्या पथकात समाविष्ट नव्हते. विराटने उशिराने दाखल होण्यासाठी मंडळाकडे यापूर्वी परवानगी मागितली आणि मंडळाने त्यांची विनंती मान्यही केली होती. न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेल्या पहिल्या पथकात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व सहायक पथकातील अन्य सदस्यांचाही समावेश आहे.
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल हे खेळाडू पहिल्या पथकातून दाखल झाले. राखीव खेळाडू शुभमन गिल व खलील अहमद हे देखील यात समाविष्ट आहेत.
यापूर्वी बुधवारी अहमदाबादेत संपन्न झालेल्या आयपीएल एलिमिनेटर लढतीत खेळणारा कोहली उशिराने भारतीय संघात दाखल होणार आहे. दुसरीकडे, आयपीएल संपल्यानंतर हार्दिक पंड्या तातडीने इंग्लंडला रवाना झाला आहे. तोही उशिरानेच भारतीय संघात दाखल होणे अपेक्षित आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार्या हार्दिक पंड्याला येथे प्ले-ऑफमधील स्थानही निश्चित करून देता आले नव्हते.
शुक्रवारी झालेल्या दुसर्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केलेले यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल व राखीव खेळाडू आवेश खान सोमवारी उशिराने अमेरिकेला रवाना होणे अपेक्षित होते. भारतीय संघ आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धेला प्रत्यक्ष प्रारंभ होण्यापूर्वी बांगला देशविरुद्ध एकमेव सराव सामना खेळणार आहे. ही लढत नॅसू कौंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. येथेच भारताचे तिन्ही साखळी सामने होत आहेत. यात पाकिस्तानविरुद्ध ब्लॉकबस्टर लढतीचाही समावेश आहे. एकाच ठिकाणी तिन्ही साखळी सामने होत असल्याने आणि येथेच सराव सामनाही खेळवला जाणार असल्याने भारताला येथील वातावरणाचा उत्तम अंदाज येण्यास वाव असेल.