येरवडा परिसरात पाण्यासाठी वणवण; तीन दिवसांपासून पुरवठा विस्कळीत
येरवडा : Bharat Live News Media वृत्तसेवा : लष्कर पाणीपुरवठा केंद्रातील विद्युत पंप नादुरुस्त झाल्याने येरवडा परिसरातील प्रभाग सहामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या भागात महापालिकेकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत तो अपुरा असल्याने पाणी भरण्यासाठी टँकरभोवती गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लष्कर पाणीपुरवठा केंद्रातील विद्युत पंपातून धूर येत असल्याने तो नादुरुस्त झाला आहे. यामुळे परिसरात पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पुरवठा विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 24) पाणीपुरवठा बंद (क्लोजर) असल्याने परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तसेच, शनिवारी विद्युत पंपात बिघाड झाल्याने या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
‘क्लोजर’च्या दोन दिवस आधीदेखील या भागात कमी दाबाने पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवार आणि शनिवारी या भागात पाणी आले नसल्याने रविवारी परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. परिसरातील रस्ते लहान असल्याने टँकर टंचाईग्रस्त भागात पोहोचणे कठीण होत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. येरवडा गाडीतळ, यशवंतनगर, मदर तेरेसानगर परिसरात रविवारी सकाळी अर्ध्या तास भामा आसखेड योजनेतून पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच, सायंकाळी लक्ष्मीनगर परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
एकाच महिन्यात दोन वेळा विद्युत पंप नादुरुस्त झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रहिवासी महापालिकेचे सर्व कर भरतात, तरीदेखील त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात प्रशासन कमी पडत आहे.
-अश्विनी लांडगे, माजी नगरसेविका
लष्कर पाणीपुरवठा केंद्रातील विद्युत पंप नादुरुस्त झाल्याने या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. भामा आसखेड योजना, तसेच टँकरद्वारे परिसरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विद्युत पंप दुरुस्त करून पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येईल.
– रवींद्र वानखडे, कनिष्ठ अभियंता, लष्कर पाणीपुरवठा केंद्र
हेही वाचा
IPL 2024 : शाहरुखने केले किस; गौरीने दिली अशी पोज, सुहानाने मारली मिठी
पंजाब, हरियाणा, हिमाचलसह दिल्लीत कोणाला संधी?
विद्येच्या प्रांगणात धुँआ! विद्यापीठ प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष