महापालिकेतील आशासेविकांची पदे रिक्त; योजनांच्या उद्दिष्ट पूर्तीस अडचणी
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : शासनामार्फत देण्यात आलेल्या आरोग्यविषयक योजना, सोयी-सुविधा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी कामावर आधारित मोबदला या तत्त्वावर शहरात आशासेविका कार्यरत आहेत. शहरात दोन हजार ते अडीच हजार लोकसंख्येसाठी 1 याप्रमाणे महापालिकेसाठी 1124 आशा सेविकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी केवळ 588 आशासेविका कार्यरत असून, 47 टक्के पदे रिक्त आहेत.
आशासेविका एकूण 49 आरोग्य निर्देशांकांप्रमाणे आरोग्य योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. त्यासाठी त्यांना योजनेप्रमाणे मानधन दिले जाते. आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून, आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्यासंदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे, वाटाघाटी निर्माण करणे यादृष्टीने आशासेविका महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात. मात्र, याच आशासेविकांची निम्मी पदे रिक्त असल्याने योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.
महापालिकेमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये आशासेविकांच्या भरलेल्या पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या जास्त असल्याचे महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आशासेविका वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन आरोग्यविषयक माहिती संकलित करण्याचे, आरोग्य योजनांबाबत जनजागृतीचे काम करत असतात. मात्र, त्यांना मिळणारा मोबदला तुटपुंजा आहे. याशिवाय, हक्काच्या सुट्या, आरोग्य विमा अशा कोणत्याच सुविधा त्यांना लागू होत नाहीत. त्यामुळे आशासेविकांचे काम करण्यासाठी महिला पुढे येत नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या कार्यालयामध्ये 197 आशा कार्यकर्तींच्या निवडीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर, 197 आशासेविकांची पदे मंजूर केली जातील, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
काय आहेत आशासेविकांची कामे ?
आरोग्य संस्थेतील प्रसूतींमध्ये वाढ करणे
मलेरिया, क्षयरोग, साथीचे रोग उपचारासाठी मदत
मोफत संदर्भ सेवेचा प्रचार
कुटुंब कल्याण प्रचार, गर्भनिरोधकाचे वाटप
साध्या (किरकोळ) आजारावर उपचार उदा. ताप, खोकला यावर औषधी संचातील औषधांचा वापर
माता व बाल आरोग्यविषयी प्रबोधन उदा. प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या, आहार इत्यादी.
जन्म व मृत्यू नोंदणीमध्ये मदत
आशासेविका पदांची स्थिती
वर्ष मंजूर भरलेली रिक्त
पदे पदे पदे
2022-23 595 295 300
2023-24 1124 468 658
2024-25 1124 588 536
हेही वाचा
Nashik | आपत्ती निवारणासाठी जिल्हा व्यवस्थापन सज्ज; आठ रबरी बोट्स दाखल
Pune Porsche Accident : अपहरणासाठी वापरलेल्या बीएमडब्ल्यूचा शोध सुरू
Nashik | इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणात ३ जण बुडाले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू