शेकाप नेते राहुल देशमुखांना अटक; सामाजिक सौहार्द बिघडविल्या प्रकरणी कारवाई
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच राज्यात विविध कारणांमुळे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. आज शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे माजी नगराध्यक्ष आणि शेकापचे नेते राहुल देशमुख यांना एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणी विशिष्ट समाजविरोधात पत्रक, आक्षेपार्ह विधान करीत सामाजिक सौहार्द बिघडविल्याच्या प्रकरणात काटोल पोलिसांनी अटक केल्यानंतर वातावरण तापले. मोठ्या प्रमाणावर या कारवाईच्या निषेधार्थ नागरिकांनी रस्त्यावर उतरून नाटोल बंदची हाक दिली.
दरम्यान, ही माहिती मिळताच माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख देखील काटोल साठी रवाना झाले. त्यांनी नागरिकांशी चर्चा केली आणि ते धरणे आंदोलनात नागरिकांसोबत सहभागी झाले. राहुल देशमुख, अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणा देत नागरिक, देशमुख समर्थकांनी शहरात पोलीस स्टेशनच्या दिशेने मोर्चा काढल्याने व रस्ता रोको केल्याने पोलिस बंदोबस्तही खबरदारी म्हणून वाढविण्यात आला.
या सर्व गदारोळात नागपूर काटोल मुख्य मार्गावरील वाहतुक काही काळ बंद पडली. संतप्त नागरिकांचा रस्ता रोको सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळाले. राज्यात भाजप, महायुती सरकार लोकशाहीच्या नव्हे तर व्यक्तिस्वातंत्र्य नाकारत, दडपशाही मार्गाने वागत असल्याचा संताप यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह नागरिकांनी व्यक्त केला.