धावत्या रेल्वेतच निकाह आणि हनिमून, एका डॉनची अधुरी प्रेमकहाणी!

मॅन, मनी आणि मसल पॉवरच्या जोरावर सार्‍या व्यवस्थेला कशा प्रकारे आपल्या दिमतीला उभे करायचे, याचे उदाहरण म्हणजे डॉन अबू सालेम! अबू सालेमने जेलमध्ये राहून आपल्या सगळ्या ऐषोआरामाच्या गोष्टी मिळवल्या; मात्र कहर तर तेव्हा झाला, जेव्हा अबूने अटकेत असतानाच पोलिसांच्या साक्षीने चक्क धावत्या रेल्वेतच एका तरुणीशी निकाह केला… एवढेच नाही, तर रेल्वेतच हनिमून देखील साजरा केला… …

धावत्या रेल्वेतच निकाह आणि हनिमून, एका डॉनची अधुरी प्रेमकहाणी!

नरेंद्र राठोड, पुणे

मॅन, मनी आणि मसल पॉवरच्या जोरावर सार्‍या व्यवस्थेला कशा प्रकारे आपल्या दिमतीला उभे करायचे, याचे उदाहरण म्हणजे डॉन अबू सालेम! अबू सालेमने जेलमध्ये राहून आपल्या सगळ्या ऐषोआरामाच्या गोष्टी मिळवल्या; मात्र कहर तर तेव्हा झाला, जेव्हा अबूने अटकेत असतानाच पोलिसांच्या साक्षीने चक्क धावत्या रेल्वेतच एका तरुणीशी निकाह केला… एवढेच नाही, तर रेल्वेतच हनिमून देखील साजरा केला…
कुख्यात गुंड अबू सालेमला 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या अबू तळोजा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. नव्वदच्या दशकात अबू सालेम दाऊद गँगसाठी काम करीत असताना तो बॉलीवूडवर मजबूत पकड ठेवून होता. बॉलीवूडमधून पैसा गोळा करणे, फिल्मला फायनान्स करणे, मर्जीतल्या हिरो-हिरोईनला काम मिळवून देणे आदी काम तो करायचा. अख्ख्या बॉलीवूडमध्ये ‘कॅप्टन’ नावाने ओळखला जाणारा अबू सालेमच्या एका फोन कॉलने त्या काळी भल्याभल्या कलाकारांची तारांबळ उडायची. याच सालेमने 1997 साली संगीत सम्राट गुलशन कुमार यांची हत्या घडवून आणली होती.
अबू सालेम रंगिल्या स्वभावाचा असल्याने तो बॉलीवूडमधल्या अनेक हिरोईनच्या प्रेमात पडायचा. सुरुवातीला अबू सालेम बॉलीवूडची हिरोईन मोनिका बेदी हिच्या प्रेमात आकंठ बुडाला व त्याने मोनिका बेदीशी लग्न केले. इतकेच नव्हे, तर त्याने नाव व धर्म बदलून पोर्तुगाल देशात मोनिका सोबत संसार देखील थाटला होता. भारतात आपल्या जीवाला धोका असल्यानेच आपण पोर्तुगालमध्ये राहण्यास इच्छुक असल्याचे मोनिका आणि अबूने पोर्तुगाल अधिकार्‍यांना सांगितले होते. पण, मोनिका आणि सालेमने पोर्तुगाल सरकारला पासपोर्टसाठी दिलेले दस्तावेज खोटे असल्याची बाब उघड झाली आणि त्याला अटक करण्यात आली. सालेमच्या हातात बेड्या पडताच मोनिका बेदीने त्याच्याशी असलेले संबंध तोडले.
त्यानंतर पोर्तुगीज सरकारने त्यास भारताच्या हवाली केले. याच काळात तुरुंगात राहून देखील अबू सालेमने त्याच्या काही हस्तकांच्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रात राहणार्‍या एका 26 वर्षीय तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 2017 साली अबू सालेम यास एका खटल्याच्या सुनावणीसाठी लखनौ येथे नेले जात होते. यावेळी त्याला घेऊन जाणार्‍या पोलिसांना त्याने मॅनेज करून चक्क रेल्वेतच तरुणीशी निकाह केला होता. विशेष म्हणजे या निकाहाला पोलिस अधिकारी आणि अबू सालेम याचा भाचा रशीद अन्सारी हा देखील साक्षीला होता. एवढेच नव्हे, तर अबूने या तरुणी सोबत रेल्वेतच हनिमून देखील साजरा केला होता.
या घटनेची वाच्यता होताच या घटनेची चौकशी ठाणे पोलिसांनी सुरू केली होती. या प्रकरणात अबू सालेम हिच्याशी निकाह करणार्‍या तरुणीची देखील पोलिसांनी चौकशी केली होती. दरम्यान, आपण अबूशी निकाह करून कुठलीही चुकी केली नाही, असा जबाब संबंधित तरुणीने त्यावेळी मुंब्रा पोलिसांना दिला होता. त्यानंतर या तरुणीने अबू सालेम याच्याशी निकाह करण्याची परवानगी मिळावी, यासाठी थेट विशेष टाडा न्यायालयातच अर्ज देखील दाखल केला होता. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला होता. आज अबू कारागृहात आपल्या कर्माची फळे भोगीत आहे, तर त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी लैला पश्चात्तापात होरपळत आहे.
हेही वाचा 

क्राईम डायरी : ओव्हरअ‍ॅक्टिंग | Bharat Live News Media
Pudhari Crime Diary : ज्या साडीत पांडबाचा जीव अडकला, तिच साडी त्याच्या गळ्याभोवतीचा फास बनून गेली
Pudhari Crime Diary : कुटुंब कलह : पहिला आघात महिलांवरच!