बिल्डरपुत्राची रवानगी अखेर बालसुधारगृहात

बिल्डरपुत्राची रवानगी अखेर बालसुधारगृहात

पुणे; Bharat Live News Media वृत्तसेवा :  शहरातील कल्याणीनगर येथे मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवून दोन आयटी इंजिनिअरचा बळी घेतलेल्या कारचालक अल्पवयीन मुलाला चौदा दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश बाल न्याय मंडळाने बुधवारी दिले. या मुलाला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात राहावे लागणार आहे. (Pune Porsche Accident)
शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास दुचाकीवरून निघालेल्या तरुण-तरुणीला अल्पवयीन मुलगा भरधाव वेगात चालवत असलेल्या पोर्श आलिशान कारने धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. अगोदर दिलेल्या जामिनाचा पुनर्विचार करण्यात यावा, यासाठी पोलिसांनी बाल न्याय मंडळात अर्ज केला होता. त्यावर मंडळाच्या प्रमुख दंडाधिकारी एम. पी. परदेशी, सदस्य डॉ. एल. एन. धनवडे आणि के. टी. थोरात यांच्या मंडळासमोर बुधवारी दिवसभर सुनावणी झाली. त्यानंतर मंडळाने निकाल राखून ठेवला होता. रात्री आठच्या सुमारास निकाल देत मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
या सुनावणीमध्ये, कल्याणीनगरमधे झालेल्या अपघातानंतर आरोपीविषयी नागरिकांमध्ये रोष आहे. त्यातून त्याला इजा पोहोचेल अशा घटना घडू शकतात. त्यामुळे त्याने बाहेर राहणे धोकादायक ठरू शकते, असे म्हणणे पोलिसांनी सादर केले. जामीन झाल्यानंतर मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यासाठी काही बदल गरजेचे आहेत. त्यामुळे आता त्याला बालसुधारगृहात पाठवणे कायदेशीर नाही, असा युक्तिवाद मुलाचे वकील प्रशांत पाटील यांनी केला. लेखी आदेश मिळाल्यानंतर याबाबत अपील करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, मुलाला प्रौढ म्हणून खटला चालविण्यासाठी पोलिसांचा अर्ज मंडळाने दाखल करून घेतला असून, त्यावर निर्णय झालेला नाही, असे मुलाचे वकील अ‍ॅड. प्रशांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधिसंघर्षित बालकावर तीस दिवसांत आरोपपत्र दाखल करणे गरजेचे आहे. त्यानंतर या बालकाच्या सामाजिक, मानसिक स्थितीबाबत अहवाल लक्षात घेतले जातात. या काळात त्याला बालसुधारगृहात ठेवण्याची आवश्यकता नसते. साठ ते नव्वद दिवसांच्या प्रक्रियेनंतर मुलाला प्रौढ ठरविण्याचा निर्णय घेतला जातो, असे अ‍ॅड. प्रशांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Pune Porsche Accident)
‘या’ अटीवर जामीन झाला होता
कल्याणीनगर येथे आलिशान मोटार भरधाव चालवून दुचाकीस्वार तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी या अल्पवयीन कारचालकाविरोधात भारतीय दंडसंहितेनुसार, बेदरकारपणे वाहन चालविणे, हयगयीने मृत्यूचे कारण ठरणे, इतरांच्या जीवाला धोका पोहोचविणारी कृती करणे यासह मोटार वाहन कायद्याखाली पोलिसांनी जामीनपात्र कलमे लावण्यात आली. रस्ते अपघात आणि त्यावर उपाययोजना या विषयावर तीनशे शब्दांचा निबंध लिहावा, पंधरा दिवस वाहतूक नियमनाचे काम करावे, अशा अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी या मुलाच्या जामिनाचा पुनर्विचार करण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे धाव घेतली होती.
केस कापून, टापटीप होऊन आला कोर्टात
बुधवारी सकाळी येरवड्यातील बाल न्याय मंडळामध्ये कार चालवणारा अल्पवयीन मुलगा हजर झाला. त्याच्यासोबत त्याची आई, आजोबा आणि नातेवाईक होते. तसेच वकिलांची टीमदेखील होती. धीरगंभीर अवस्थेत मुलगा दिसत होता. सीसीटीव्हीमध्ये केस वाढविलेले दिसत असलेला मुलगा आज टापटीप, केस कापून बाल न्यायालय मंडळात हजर झाला. (Pune Porsche Accident)