इंदापूर : भीमा नदीत बोट बुडाली; बचावकार्य सुरू

इंदापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : उजनी धरण पात्रात मंगळवारी (दि. २१) सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडाली. इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे ही बोट प्रवास करत होती. यामध्ये सात जण बुडाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. यातून एकाने पोहत आपला जीव वाचवला आहे.
कळाशी गावच्या हद्दीत उजनी पात्रात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कळाशीहुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीच्या बाबतीत अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीमध्ये एकूण तीन पुरुष, दोन महिला, दोन लहान मुली असे ७ प्रवासी आणि बोट चालक असे एकुण ८ जण प्रवास करत होते. यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे पोहत कळाशी (ता. इंदापूर) या ठिकाणी आले आहेत.
सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी वारा व पावसाने हजेरी लावल्याने या वादळी वाऱ्याच्या वेगाने आणि पाण्याच्या लाटांनी ही बोट पलटी झाली असल्याचा अंदाज आहे. घटना समजतात बचाव कार्यासाठी महसूल पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ पोहचले आहेत.
