लोकसभा निवडणुकीत राज्यात चमत्कार घडेल : अनिल देशमुख

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चमत्कार घडणार असून महाविकास आघाडीचे ३५ ते ४० खासदार निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरचंद्र पवार) गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
देशमुख म्हणाले की, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस व इतर घटक पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे आमचा विजय नक्की असून सत्ताधारी पक्षांना ४ जूननंतर तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही.
राज्यात महागाई, बेरोजगारीसह कापूस, कांदा, सोयाबीन या शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, मोठे उद्योग प्रकल्प गुजरातमध्ये पळवून नेण्याचा मुद्दा, कंत्राटी भरती आणि अग्निविर योजनेविषयी जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात संतापाची लाट होती. निवडणुकीच्या निकालातून ती दिसून येईल, असा दावा देशमुख यांनी केला. मुंबईत सोमवारी मतदानासाठी मतदारांना ४ ते ५ तास रांगेत उभे रहावे लागल्याबद्दल नाराजी व्यक्त करून संबंधित यंत्रणेचे हे अपयश असल्याचे देशमुख यांनी म्हटले.
पुण्यातील अपघातप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा !
पुण्यात एका भरधाव कारने दोघांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील आरोपीवर राजकीय हस्तक्षेपामुळे कुठलीही कारवाई झाली नसल्याबद्दल देशमुख यांनी खेद व्यक्त केला. या प्रकरणातील कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केली.
