जाणून घ्या शेअर्स बाजाराचा भयसूचकांक ‘व्हीक्स’विषयी

भारतीय शेअरबाजाराचा चढ-उतार दर्शक (व्हीक्स) राष्ट्रीय सूचकांक निफ्टीमधील वायदा बाजार व्यवहाराच्या 30 दिवसांच्या अपेक्षित चढउताराशी निगडित असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. यामागे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय घटक कार्यरत आहेत. शेअरबाजारात घसरणीचे भय व तेजीचा लोभ सातत्याने काम करीत असतात. ज्यांना भविष्यकाळात किमती घसरतील, असा अंदाज वाटतो ते शेअर्स विक्री करणारे म्हणजे मंदीवाले (अस्वले), तर …

जाणून घ्या शेअर्स बाजाराचा भयसूचकांक ‘व्हीक्स’विषयी

प्रा. डॉ. विजय ककडे

भारतीय शेअरबाजाराचा चढ-उतार दर्शक (व्हीक्स) राष्ट्रीय सूचकांक निफ्टीमधील वायदा बाजार व्यवहाराच्या 30 दिवसांच्या अपेक्षित चढउताराशी निगडित असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. यामागे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय घटक कार्यरत आहेत.
शेअरबाजारात घसरणीचे भय व तेजीचा लोभ सातत्याने काम करीत असतात. ज्यांना भविष्यकाळात किमती घसरतील, असा अंदाज वाटतो ते शेअर्स विक्री करणारे म्हणजे मंदीवाले (अस्वले), तर ज्यांना दर वाढतील, या अपेक्षेने खरेदी करणारे तेजीवाले (बैल-वृषभ) म्हणतात. यांच्यापैकी ज्याची शक्ती अधिक त्यांच्या बाजूला बाजाराचा कल झुक तो व शेअर बाजारात उसळी किंवा घसरण दिसते. दीर्घकाळात मात्र विविध कंपन्याचे सकारात्मक व वृद्धीचे परिणाम म्हणून बाजार वृद्धिंगत होतो. यामध्ये ‘वायदा बाजार’ ही यंत्रणा व त्यातील सहभागी व्यवहार हे बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार व परिणाम करीत असतात. यातही पुढील 30 दिवसांचे खरेदीचे (call) व विक्रीचे (put) व्यवहार अधिक महत्त्वपूर्ण ठरत असतात. त्यातून बाजारात एकूण स्थैर्य असेल का, चढ-उतार मोठे होतील याचा कल स्पष्ट होतो. जर युद्ध, निवडणुका, मोठी आपत्ती अपेक्षित असेल, तर बाजारात ‘भय’ निर्माण होते व त्यातून बाजार भयंकर तेजी-मंदीचा होतो. जसे आपला रक्तदाब (बीपी) संकटात वाढतो तसेच इथे घडते. अशा ‘भय’ सूचक स्थितीचे संख्यात्मक मापन करणारे तंत्र शिकागो विनिमय केंद्र (अमेरिका) 1993 मध्ये व्हीक्स किंवा Volatility Index-VIX विकसित केले. रक्तदाबाचे मापन जसे सर्वसाधारण व चिंताजनक अशा गटात करतात तसेच बाजाराचा चढ-उतार दर्शक मोजला जातो. भारतात 2008 पासून व्हीक्स मापन केले जाते. हे तंंत्र बाजाराचा ‘भयसूचकांक’ म्हणून ओळखले जाते.
भयसूचकांक मापन (व्हीक्स मापन)
बाजारातील आगामी वातावरण गुंतवणुकीस स्थैर्य देणारे, पोषक आहे का? मोठ्या चढउताराचे, अनिश्चिततेचे आहे याचे मोजमाप करण्यासाठी गुंतागुंतीची संख्याशास्त्रीय पद्धत वापरली जाते. यासाठी निफ्टीच्या वायदेबाजारातील व्यवहारातील K म्हणजे स्ट्राईक प्राईस अथवा चालू वायदा किमती हा पहिला घटक असतो. निफ्टीच्या शेअर्स किमती हा (S) दुसरा घटक घेतात. वायदा पूर्ण होण्यास किती कालावधी (T) शिल्लक आहे. हा तिसरा घटक असतो तर शासकीय बंधपत्रे जे अतिशय सुरक्षित मानले जातात. त्यावरील परतावा दर (R) हा शून्य जोखीम दर घेतला जातो. यातील शेवटचा परंतु अत्यंत महत्त्वाचा घटक चढ-उतार (S) हा बाजारातील किंमत चढ-उतार तीव्रतेच्या अंदाजाशी निगडित असतो. निफ्टी वायदा बाजार किमतीवर हा अंदाज अवलंबून असतो.
भयसूचकांकाची उपयुक्तता (व्हीक्स वापर)
शेअर्स बाजारात व्यवहार करणारे सट्टेबाज, गुंतवणूकदार तसेच म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापक या सर्वांना निर्णय प्रक्रियेत मदत करणारा उपयुक्त निर्देशांक म्हणून भयसूचकांक अथवा व्हीक्स वापरता येतो. तेव्हा व्हीक्स कमी असतो तेव्हा बाजारात स्थैर्य अपेक्षित राहते. गुंतवणुकीस पोषक व कमी जोखीम दर्शवते. जर व्हीक्स अधिक असेल, वाढत असेल तर बाजारात विश्वासाचे वातावरण नसते. बाजार घसरणीचे, अस्थिरतेचे व त्यामुळे गुंतवणूक न करण्याचे सूचित करतो. कोव्हिडच्या काळापूर्वी असणारा व्हीक्स, कोव्हिड येताच 30 वरून 50 झाला, तर बाजार 40 टक्के घसरला.
महत्त्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे व्हीक्स हा दिशाहीन अथवा अदिश (Non Directional) दर्शक आहे. व्हीक्स आणि निफ्टी यांचा सहसंबंध उणे दर्शवतो. जेव्हा व्हीक्स वाढतो तेव्हा निफ्टी घसरतो असे गेल्या दशकभराच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
व्हीक्सचा वापर शेअर
बाजारातील दैनंदिन व्यवहार करणारे धोक्याचे प्रमाण वाढले आहे हे समजून घेऊन नुकसान प्रमाण कमी करू शकतात किंवा सावधपणे व कमी व्यवहार करू शकतात. दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या द़ृष्टीने हा भयसूचकांक फारसा चिंतेचा विषय ठरत नाही. कारण कालांतराने बाजार पूर्ववत झालेला असतो. काही उत्तम गुंतवणूक संधी याच काळात उपलब्ध असतात त्याचा फायदा घेऊ शकतात. मोठे व संख्यात्मक गुंतवणूकदार हेज तंत्र (Hedge Technique) किंवा संरक्षण तंत्र वापरून आपले संभाव्य नुकसान मर्यादित करू शकतात. या तंत्राचा वापर सर्वाधिक प्रमाणात वायदे बाजारात खरेदी व विक्रीचे पर्याय (Options) विक्री करताना करतात. बाजारातले चढ-उतार मोठा फायदा देऊ शकते. अनिश्चितेचा फायदा घेण्यास एकाचवेळी खरेदी व विक्री करण्याचे स्टॅ्रडल तंत्र वापरता येते. जेव्हा व्हीक्स वाढतो तेव्हा म्युच्युअल फंड व्यवस्थापक उच्च चढ-उतार असणारे (हाय बीटा) शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवून परतावा वाढवू शकतात. व्हीक्स घटल्यास कमी चढउताराचे शेअर्स खरेदी वाढवतात.
गुंतवणूक दिशा :
निवडणुका आणि धोरण अनिश्चितता यातून बाजारातील अनिश्चितता व चढ-उतार वाढतात व नंतर बाजार स्थिरावतो. याचा फायदा घेण्यास भय सूचकांक उपयुक्तठरते. तसेच उत्तम गुंतवणूक असूनही केवळ ‘भय’ नुकसानीचे ठरू शकते ते टाळण्यासाठी याचा उपयोग होतो. वर्धिष्णु व उत्तम व्यवस्थापित भारतीय शेअरबाजार सातत्यपूर्ण चांगला परतावा दीर्घकालीन देत असल्याने गुंतवणूक दिशा सकारात्मक ठेवणेच उपयुक्त ठरते.
भारतीय व्हीक्स
भारतीय शेअर बाजाराचा चढ-उतार दर्शक (व्हीक्स) राष्ट्रीय सूचकांक निफ्टीमधील वायदा बाजार व्यवहाराच्या 30 दिवसांच्या अपेक्षित चढउताराशी निगडित असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. त्यामागे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय घटक कार्यरत आहेत. देशाच्या पातळीवर लोकसंख्येच्या (सार्वत्रिक) निवडणुका ही महत्त्वाची घटना असून, नव्या सरकारच्या धोरण अनिश्चिततेशी तो जोडलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचे व्याज दर धोरण (फेडरेट) व युद्धजन्य-तणाव स्थिती ही आंतरराष्ट्रीय स्थिती बाजारात ‘भय’अनिश्चितता वाढवणारे ठरते. याच बरोबर कोरोनासारख्या काळातही गुंतवणूक भय वाढते. भारताच्याबाबत निवडणुकीचा व भयसूचकांकाचा संबंध अतिशय स्पष्ट असून, जागतिक पडझड 2008 मध्ये झाली तेव्हा तो 92 इतका मोठा होता. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीपूर्वी व्हीक्स 39 झाला तर 2019 च्या निवडणूकपूर्व 30 पर्यंत वाढला. सध्या व्हीक्स 17 पासून 22 पर्यंत वाढला असून, 30 पर्यंत जाण्याची संभाव्यता व्यक्तकेली जाते. भारताचा व्हीक्स 15 ते 30 या सर्वसाधारण पातळीत मानला जातो. जेव्हा व्हीक्स 15 आहे असे म्हणतात तेव्हा पुढील 30 दिवसांत शेअर निर्देशांक 15% वर किंवा खाली येऊ शकतात, असा त्याचा अर्थ होतो.