राज्यात लोकसभेचे 11 उमेदवार अब्जाधीश!

ठाणे : महाराष्ट्रात 11 अब्जाधीश उमेदवार हे लोकसभेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून त्यामध्ये भाजपचे सात उमेदवार असून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रत्येकी एक आणि एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज हे सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांची 338 कोटींची संपत्ती आहे. सातार्‍याचे भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांची 225 कोटींची संपत्ती …

राज्यात लोकसभेचे 11 उमेदवार अब्जाधीश!

दिलीप शिंदे

ठाणे : महाराष्ट्रात 11 अब्जाधीश उमेदवार हे लोकसभेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून त्यामध्ये भाजपचे सात उमेदवार असून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रत्येकी एक आणि एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज हे सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांची 338 कोटींची संपत्ती आहे.
सातार्‍याचे भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांची 225 कोटींची संपत्ती असून माढामधील भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांची 205 कोटी जाहीर करण्यात आली आहे. महिला उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांची 166 कोटींची संपत्ती असून त्यांची भावजय सुनेत्रा अजित पवार 121 कोटीच्या मालकीण आहेत. भिवंडीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे 116 कोटींचे मालक असून मुंबईतील भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांच्याकडे 110 कोटी तर भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांची 107 कोटी आणि कपिल पाटील यांच्याकडे 104 कोटींची मालमत्ता आहे.
माढा लोकसभेचे भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे आहेत. निंबाळकर कुटुंबीयांची एकूण संपत्ती 205 कोटी असून त्यामध्ये 181 कोटी 31 लाखांची जंगम मालमत्ता असून 24 कोटी 50 लाखाची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर 47 कोटी 56 लाखांचे कर्ज आहे.
लोकसभेत प्रमुख पक्षाचे बहुतेक उमेदवार हे लखपती आणि कोट्यधीश आहेत. मात्र 100 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती असलेले 11 उमेदवार आहेत. त्यामध्ये आघाडीवर आहेत कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज. शाहू महाराज यांच्या कुटुंबीयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता अशी एकूण 338 कोटींची संपत्ती आहे. त्यापैकी 297 कोटी 37 लाख संपत्ती ही शाहू महाराजांची असून त्यांच्या पत्नीच्या नावे 41 कोटी 6 लाखांची संपत्ती आहे. इंदोरमध्ये बीए उत्तीर्ण झालेल्या शाहू महाराजांचे वार्षिक उत्पन्न 2 कोटी 8 लाख 33 हजार इतके आहे. त्यांच्याकडे 9 मोटार वाहने, त्यामध्ये 1936 ची विंटेज कार आहे. ही कार 1962 मध्ये 5 कोटी रुपये देऊन महाराजांनी खरेदी केलेली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आपल्या कुटुंबीयांची संपत्ती 121 कोटींची जाहीर केली आहे. विशेष म्हणजे त्या अजित पवारांपेक्षा श्रीमंत आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे 70 कोटी 95 लाख जंगम आणि स्थावर मालमत्ता असून अजित पवार यांच्याकडे 50 कोटी 40 लाखांची मालमत्ता आहे. 16 कोटी कर्जापैकी 12 कोटी 11 लाखांचे कर्ज हे सुनेत्रा यांच्यावर आहे. बीकॉम झालेल्या सुनेत्रा यांच्याकडे दहा वाहने असून त्यांच्याकडे 24 लाखांचे हिरे आहेत.
मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपचे खासदार पीयूष गोयल यांची 110 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या नावे कर्ज नसले तरी त्यांच्या पत्नीच्या नावे 14 कोटी 22 लाखांचे कर्ज आहे. गोयल कुटुंबीयांच्या 89 कोटी 85 लाख जंगम मालमत्तेमध्ये त्यांची 35 कोटी 64 लाख 80 हजार तर पत्नीची 53 कोटी 61 लाख संपत्ती आहे. इतर 60 लाख 75 हजारांची संपत्ती असून 21 कोटी 8 लाखांची स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे.
ठाणे जिल्ह्यात सर्वात श्रीमंत उमेदवार हे भिवंडीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे असून त्यांच्याकडे 116 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या कुटुंबाकडे 32 कोटी 47 लाखांची जंगम मालमत्ता असून 83 कोटी 37 लाखांची स्थावर मालमत्ता असे एकूण 116 कोटींची संपत्ती आहे. 12 कोटी दायित्व आहे. दुसर्‍या क्रमांकांवर सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांची संपत्ती असून त्यांच्याकडे 107 कोटी 6 लाखांची संपत्ती आहे. म्हात्रे यांच्याकडे 60.9 कोटी जंगम मालमत्ता आणि 46.6 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर 75 कोटींचे दायित्व आहे. भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता 104 कोटी 36 लाख एवढी असून त्यामध्ये त्यांच्या पत्नीची संपत्ती 27 कोटी 71 लाख 75 हजार इतकी आहे.
मागासलेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील भाजपचे खासदार सुनील मेंढे यांची 101 कोटींची संपत्ती आहे. त्यातील सुनील यांच्याकडे 72 कोटी तर त्यांची पत्नी 29 कोटींची संपत्ती दाखविण्यात आली आहे. 18 कोटी 92 लाखांची जंगम आणि 82 कोटी 64 लाखांची स्थावर मालमत्ता असून 8 कोटी 36 लाखांचे कर्ज त्यांच्यावर आहे. त्याच जोडीला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची 76 कोटींची जंगम आणि स्थावर मालमत्ता असून त्यांच्यावर 55 कोटी 23 लाखांचे कर्ज आहे. विशेष म्हणजे यांच्याकडे 25 लाखांची रोख आहे. बीए भाग एक शिकलेल्या प्रतिभा या शेती आणि व्यवसायही सांभाळतात. त्यांची जंगम मालमत्ता 40 कोटी 3 लाख तर स्थावर मालमता 36 कोटी पेक्षा जास्त आहे.
मुंबई उत्तर पश्चिमचे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांची 54 कोटी 51 लाखांची संपत्ती आहे. बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे-पालवे यांची संपत्ती 46 कोटी 11 लाख असून त्या आणि त्याचे पती चारुदत्त पालवे यांचावर 9 कोटी 94 लाखांचे कर्ज नमूद करण्यात आले आहे. पंकजा यांची जंगम मालमत्ता 6 कोटी 17 लाख तर स्थावर मालमत्ता 4 कोटी 45 लाख अशी दाखवलेली आहे. त्यांच्या पतीची 35 कोटी 48 लाख जंगम आणि स्थावर मालमता आहे. मुंबईतही रुईया महाविद्यालयातून बीएस्सी केलेल्या मुंडे या माजी मंत्री आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अहमदनर येथील उमेदवार निलेश लंके यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता 73 लाखांची फक्त असून त्यांच्यावर 37 लाखांचे कर्ज आहे. सर्व मुख्य पक्षांच्या उमेदवारांमध्ये ते सर्वात गरीब उमेदवार असल्याचे दिसून येत असून महिला उमेदवारांमध्ये 90 लाखांची जंगम आणि स्थावर मालमत्ता असलेल्या पालघरच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी या गरीब उमेदवार दिसतात. त्यांच्यावर 11 लाखांचे कर्जही दिसून येते.
दुसर्‍या क्रमांकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज सातार्‍याचे भाजप उमेदवार उदयनराजे यांची संपत्ती आहे. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 225 कोटीची संपत्ती दाखविली आहे. त्यामध्ये जंगम मालमत्ता सुमारे 20 कोटी 61 लाखांची असून स्थावर मालमत्तेची किंमत 202 कोटींपेक्षा अधिक आहे. त्यांच्याकडे ऑडी, मर्सेडिज अशा आलिशान दहा गाड्या असून त्यांच्यावर 5 कोटी 29 लाखांचे कर्ज आहे. राजे यांच्यावर 2 कोटी 29 लाख आणि त्यांच्या पत्नीवर 3 कोटी 16 लाखांचे कर्ज आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये बारावी झालेले राजे हे पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसार्वा खासदार शरद पवार यांची सुकन्या सुप्रिया सुळे या महिला उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती ही 166 कोटी पेक्षा अधिक आहे. सुळे दाम्पत्यांची जंगम मालमत्ता ही 152 कोटीची असून त्यामध्ये सुप्रिया यांची 38 कोटी आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनी 114 कोटींची आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात बारामतीमधून निवडणूक लढविणार्‍या भावजय सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलाकडून सुप्रिया सुळे यांनी 57 लाखांचे कर्ज घेतलेले आहे. कोणतेही वाहने नसलेल्या सुळे यांच्याकडे दीड कोटींचे हिरे आहेत. सुळे दाम्पत्यांवर 66 कोटींचे कर्ज असून 13 कोटीं 81 लाखांची स्थावर मालमत्ता आहे.
ना. राणेंची संपत्ती 108 कोटी 50 लाख
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील भाजप उमेदवार नारायण राणे यांची 108 कोटी 50 लाखांची संपत्ती असून त्यात जंगम मालमत्ता 54 कोटी 48 लाख आणि स्थावर मालमत्ता 54 कोटीपेक्षा अधिक आहे. त्यांच्या कुटुंबावर 32 कोटींचे कर्ज असून 78 लाखांचे हिरे देखील आहेत.