‘त्याचा’ खूनच! पण अपघाताचा बनाव, ‘असा’ झाला मर्डर मिस्ट्रीचा उलगडा

तो एक गरीब, भोळाभाबडा आणि मतिमंद तरुण होता; पण त्याच्या नावावर लाखो डॉलर्सच्या विमा पॉलिसी होत्या. विमा पॉलिसीची ही रक्कम हडप करण्यासाठी काही जणांनी त्याचा मुडदा पाडला. तब्बल तीन वर्षांनंतर त्यांनी केलेले हे पाप चव्हाट्यावर आले आणि त्यांच्या वाट्याला आला आजन्म कारावास…! अमेरिकेतील न्यूजर्सीतील पॅटरसन शहरात फ्रँकी पुलियन नावाचा एक 29 वर्षीय आणि काहीसा मतिमंद …
‘त्याचा’ खूनच! पण अपघाताचा बनाव, ‘असा’ झाला मर्डर मिस्ट्रीचा उलगडा

रणजित झेंडे, कोल्हापूर

तो एक गरीब, भोळाभाबडा आणि मतिमंद तरुण होता; पण त्याच्या नावावर लाखो डॉलर्सच्या विमा पॉलिसी होत्या. विमा पॉलिसीची ही रक्कम हडप करण्यासाठी काही जणांनी त्याचा मुडदा पाडला. तब्बल तीन वर्षांनंतर त्यांनी केलेले हे पाप चव्हाट्यावर आले आणि त्यांच्या वाट्याला आला आजन्म कारावास…!
अमेरिकेतील न्यूजर्सीतील पॅटरसन शहरात फ्रँकी पुलियन नावाचा एक 29 वर्षीय आणि काहीसा मतिमंद तरुण राहत होता. तो तिथल्याच एका शवागारात सहायक म्हणून काम करत होता. त्यापूर्वी तो अमेरिकन लष्करात होता; पण मतिमंद असल्यामुळे त्याला लष्करातून सक्तीने सेवानिवृत्त केले होते. 1980 साली एका सकाळी सहा वाजता पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसांना पॅटरसन शहरातील एका निर्जन रस्त्यावर एका कारखाली फ्रँकीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांची तीच गाडी त्या रस्त्यावरून पहाटे 4 वाजता गेली होती; पण तेव्हा तिथे काहीच नव्हते. याचा अर्थ पहाटे 4 ते 6 दरम्यान कुणीतरी फ्रँकीला धडक मारून तो ठार झाल्यावर कार सोडून पळून गेले होते, असा निष्कर्ष निघत होता.
या अपघाताची चौकशी करीत असताना पोलिसांना सुगावा लागला की, ती गाडी एका पोलिस अधिकार्‍याचीच होती आणि खूप दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. झालं… पोलिसांनी फ्रँकीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन करणार्‍या जॉन्सन नावाच्या इसमाकडेच फ्रँकी सहायक म्हणून काम करीत होता. जॉन्सनने जड अंत:करणाने फ्रँकीचे पोस्टमार्टेम केले आणि गाडीची धडक बसल्यामुळे मृत्यू, असे कारण आपल्या अहवालात दिले. फ्रँकीचे जवळचे कुणी नातेवाईक नसल्याने जॉन्सननेच त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले.
अपघाताचा तपास करताना पोलिसांनी गाडीच्या स्टिअरिंग व्हीलवरील बोटांचे ठसे शोधण्याचा प्रयत्न केला; पण ते पुसून टाकण्यात आलेले दिसले. दुसरी गोष्ट म्हणजे गाडीच्या आत काही रक्ताचे डाग दिसले. तपासणीअंती ते रक्त फ्रँकीचेच असल्याचे स्पष्ट झाले. जर अपघात गाडीच्या बाहेर झाला तर रक्ताचे डाग गाडीच्या आत कसे? हा सवाल निर्माण झाला. शेवटी या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे अन्वेषण तज्ज्ञ थॉमस यांना पाचारण केले जाते. अपघात स्थळाची छायाचित्रे आणि गाडीचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की, हा अपघात नसून खून करून अपघात दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण गाडीच्या पुढील बाजूला धडकेच्या काही खुणा नसतात. दुसरी बाब म्हणजे फ्रँकीचा कोट अपघातस्थळी निघून पडलेला असतो. अपघातानंतर मयताच्या अंगावरील कोट अशा प्रकारे निघणेच शक्य नाही, याची थॉमस यांना खात्री असते. शिवाय मृतदेह ज्या स्थितीत पडलेला असतो, ती स्थितीही संशयास्पद असते. या सगळ्यांवरून थॉमस असा निष्कर्ष काढतात की, हा अपघात नसून खूनच आहे. या सगळ्या तपासात जवळपास तीन वर्षे निघून जातात.
तीन वर्षांनंतर शेवटी थॉमस न्यायालयाच्या परवानगीने फ्रँकीचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढतात आणि पुन्हा नव्याने तपास सुरू होतो. पुन्हा एकदा पोस्टमार्टेम करण्यात येते, तेव्हा अनेक धक्कादायक बाबी पुढे येतात. फ्रँकीच्या कवटीला गोल खड्डा पडलेला असतो, मृतदेहाच्या हाता-पायाला कुठेच फ्रॅक्चर नसते, जे धडक दिल्यानंतर सर्वात पहिले घडायला पाहिजे. यावरून थॉमस निष्कर्ष काढतात की, फ्रँकीला त्याच गाडीत हातोडीसारख्या हत्याराने मारले गेले आणि नंतर त्याला खाली टाकून अपघाताचा बनाव तयार केला असावा. थॉमस यांना आणखी एक शंका येते की, ज्या जॉन्सनने आधी पोस्टमार्टेम केले त्याच्या या गोष्टी का लक्षात आल्या नाहीत? त्यांनी आपल्या अहवालात ते का नमूद केले नाही?
झालं… थॉमस आपला तपास जॉन्सनवरच केंद्रित करतात आणि नव्याने तपासाला सुरुवात करतात. या तपासादरम्यान थॉमस यांना कळते की, वर्षाला 10 हजार डॉलर्सपेक्षा कमी कमाई असणार्‍या फ्रँकीच्या नावे तब्बल एक दशलक्ष डॉलर किमतीच्या विमा पॉलिसी असतात आणि या पॉलिसींवर वारसदार म्हणून जॉन्सन, त्याची पत्नी आणि दोन मुलांची नावे असतात. या पॉलिसीच्या पैशासाठीच जॉन्सन कुटुंबीयांनी फ्रँकीचा काटा काढला असावा, अशी रास्त शंका थॉमस यांच्या मनात घर करून बसते आणि ते त्या दिशेने तपास सुरू करतात.
पण पुन्हा एक अडचण समोर येते. पॉलिसी काढण्यापूर्वी संबंधिताची वैद्यकीय तपासणी होते; पण फ्रँकी तर चक्क मनोरुग्ण होता, मग त्याची पॉलिसी कशी काय काढली गेली? थॉमस या प्रकरणाच्या मुळाशी जातात तेव्हा समजते की, पॉलिसीच्या वैद्यकीय तपासणीवेळी फ्रँकीच्या नावाने एक बनावट माणूसच पुढे करण्यात आला होता. वैद्यकीय प्रमाणपत्रावरील सह्या त्याच बनावट माणसाच्या असल्याचेही तपासात पुढे येते. यावरून पॉलिसीचे लाखो डॉलर मिळविण्यासाठी जॉन्सन कुटुंबीयांनीच हा बनाव घडवून आणल्याचे स्पष्ट होते; पण पोलिसांकडे अजून तसे ठोस पुरावे नसतात.
याच दरम्यान पोलिसांच्या हाती एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा लागतो. घटनेच्या दिवशी मध्यरात्रीनंतर अपघातातील गाडी जॉन्सनच्या घरासमोर उभी असल्याचे एकाजणाने पाहिलेले असते. पोलिसांना तो तसा जबाब देतो आणि पोलिस जॉन्सन कुटुंबातील चौघांनाही अटक करतात. केवळ पॉलिसीच्या पैशासाठी जॉन्सन आणि त्याच्या दोन तरुण मुलांनी फ्रँकीचा खून करून अपघाताचा बनाव केल्याचे सिद्ध होते. जॉन्सनच्या पत्नीचा मात्र यामध्ये सहभाग आढळून येत नाही. त्यामुळे तिची निर्दोष सुटका होते; पण न्यायालयाकडून जॉन्सन व त्याच्या दोन मुलांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येते. पॉलिसीच्या लाखो डॉलरच्या हव्यासापोटी जॉन्सन आणि त्याच्या मुलांनी बिचार्‍या गरीब, भोळ्याभाबड्या आणि मतिमंद फ्रँकीचा बळी तर घेतला; पण लाखो डॉलर तर दूरच राहिले, तिघांवरही आजन्म कारावास भोगण्याची वेळ आली.