अखेर 8 दिवसांनंतर मांडवी बुद्रुकचा वीजपुरवठा सुरू!

वेल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा : विद्युत रोहित्र जळाल्याने गेल्या 8 दिवसांपासून अंधारात असलेल्या खडकवासला धरण तीरावरील मांडवी बुद्रुक (ता. हवेली) गावात रविवारी (दि. 19) नवीन रोहित्र बसविण्यात आले. त्यामुळे गाव व परिसरातील वाड्यावस्त्यांत विजेचा लखलखाट सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात जोरदार वादळी पावसात विजेचे रोहित्र जळाल्याने मांडवी बुद्रुक गाव व परिसरातील वाड्या-वस्त्या अंधारात होत्या. कमी व जादा दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बल्ब, पीठगिरणी, टीव्ही, पंखे, पंप आदी वीज उपकरणे जळाली.
त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. वारंवार विनंत्या करूनही महावितरणकडून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत कार्यवाही होत नव्हती. अखेर याबाबत दैनिक ‘Bharat Live News Media’मध्ये रविवारी (दि. 19) ‘रोहित्र जळाल्याने मांडवी येथे अंधार’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी सकाळीच नवीन रोहित्र बसविण्याचे काम सुरू केले आणि दुपारी 12 वाजता काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरू केला.
नवीन रोहित्र उपलब्ध होत नसल्याने बदलण्यास विलंब झाला. वरिष्ठ अधिकार्यांनी याप्रकरणी लक्ष घालून तातडीने रोहित्र उपलब्ध केले. नवीन रोहित्र बसविण्यात आल्याने गाव व सर्व परिसराला पुरेसा वीजपुरवठा होणार आहे.
– नितीन धस, शाखा अभियंता, खानापूर महावितरण विभाग
वारंवार विनंत्या करूनही नवीन रोहित्र बसविले नाही. मात्र आज दैनिक ’Bharat Live News Media’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच महावितरणने दखल घेतली आणि नवीन रोहित्र बसविले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.
– सचिन पायगुडे, सरपंच, मांडवी बुद्रुक
हेही वाचा
पशुधनाच्या ईअर टॅगिंगची काटेकोर अंमलबजावणी करा : डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश
ठाणे लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २६.०५ टक्के मतदान
मतदानादिवशी राहुल गांधी यांनी घेतले हनुमानाचे दर्शन, बूथची पाहणी
