दिवसभर उकाडा, सायंकाळी धो-धो; पुणेकरांना उकाड्यापासून जरा दिलासा
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : रविवारी शहरात दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना सायंकाळच्या पावसाने जरा दिलासा मिळाला. शहरात सरासरी 0.5 ते 0.9 मि.मी. पावसाची नोंद झाली, तर पिंपरी-चिंचवड भागात 11.5 मिमी पावसाची नोंद झाली.
गेले तीन दिवस शहरात सायंकाळी सतत पाऊस सुरू आहे. दिवसभर उकाडा अन् सायंकाळी पाऊस असे चित्र दिसत आहे. रविवारी (दि.19 मे) शहरात दिवसभर भयंकर उकाडा जाणवत होता.
कमाल तापमान 36 अंंशांवरून 39.7 अंशांवर गेले होते. सायंकाळी 6 च्या सुमारास आकाश काळ्याभोर ढगांनी दाटून आले अन् विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील सर्वच पेठा आणि उपनगरांत पाऊस झाला. मात्र, शहरात पावसाचा जोर कमी होता. शहरात सरासरी 0.5 ते 0.9 मिमी पावसाची नोंद झाली. पिंपरी-चिंचवड भागात जोरदार पावसाने दाणादाण उडवून दिली. त्या भागात 11.5 मि.मी. पाऊस झाला.
रविवारी झालेला पाऊस (मि.मी.)
शिवाजीनगर : 0.5
कोरेगाव पार्क : 05
रविवारचे कमाल किमान तापमान..
शिवाजीनगर 38.7 (25.3) पाषाण 38.6 (24.8) वडगाव शेरी 41.1 (27.1) कोरेगाव पार्क 40.8 (26.9) हडपसर 40.1 (24.5) मगरपट्टा 40.1 (26.1) चिंचवड 39.2 (26.1) एनडीए 38.4 (23.5)
गर्दीतच पावसाने गाठले
रविवारचा दिवस असल्याने दुपारी प्रचंड उकाड्यातही शहरातील बाजारपेठांत गर्दी होती. बाजीराव रस्ता, दगडूशेठ गणपती रस्ता, शिवाजीनगर रस्ता, कॅम्प रस्ता, शंकरशेठ रस्ता, मार्केट यार्ड या भागांत गर्दी होती. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ झाली. लहान मुलांना कडेवर घेत नागरिकांना आडोसा गाठावा लागला. दगडूशेठ गणपती मंदिराजवळ मोठी गर्दी होती. या भागातही नागरिकांची पावसाने तारांबळ उडाली.
हेही वाचा
Leopard News : काळवाडी येथे बिबट्याला पकडण्यात अखेर यश
Nashik Lok Sabha 2024 : यादीतील नावे शोधतांना मतदारांच्या नाकीनऊ तर ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद
High Blood Pressure Day Special!..तर 2040 पर्यंत टाळता येतील भारतातील 46 लाख मृत्यू