पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशापासून राहणार वंचित
प्रवीण मस्के
कोल्हापूर : दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाचे वाटप केले जाते; मात्र सध्या जिल्हा परिषद शाळांसाठी दोन तालुक्यांमधील गणवेश शिलाई सुरू आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशबाबत संबंधित यंत्रणेने प्रशासनाशी अद्याप संपर्क साधलेला नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या घंटेला विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे अशक्य आहे.
समग्र शिक्षा अभियान व राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशाचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शिक्षण परिषदेने निविदा प्रक्रिया राबविली. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून कापड पुरवून महिला बचत गटामार्फत गणवेश शिलाई होणार आहे. शिलाई करून तयार झालेले गणवेश शाळांना दिले जाणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या 1970 प्राथमिक शाळा आहेत. यातील सुमारे 1 लाख 53 हजारांहून अधिक गणवेशाची लाभार्थी विद्यार्थी संख्या आहे. सद्य:स्थितीत कागल व हातकणंगले तालुक्यास विद्यार्थी कापड मिळाले असून गणवेशाची शिलाई सुरू आहे. उर्वरित दहा तालुक्यांमधील विद्यार्थी गणवेश शिलाई कधी सुरू होणार हे अस्पष्ट आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे सध्यातरी अशक्य आहे. विद्यार्थ्यांना शाळा उघडल्यानंतरही पुढील काही दिवस गणवेशाची वाट पाहावी लागणार आहे.
महापालिकेच्या समितीशी संपर्क नाही
महापालिकेच्या अंतर्गत शहरात 58 शाळा असून सुमारे 10 हजार 541 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले जाणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शाळा, विद्यार्थी संख्येची आकडेवारी मागितली आहे. परंतु महिला आर्थिक विकास महामंडळ व संबंधित यंत्रणेने महापालिका प्राथमिक शिक्षण समितीशी संपर्क साधलेला नाही. प्रशासनाने मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असल्या तरी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे अशक्य वाटते.