पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मान्सून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तीन दिवस आधीच रविवारी (दि. 19 मे) दुपारी दोनच्या सुमारास अंदमान-निकोबारसह बंगालच्या उपसागराच्या काही भागांत येऊन धडकला. यंदा तो नियोजित तारखेच्या एक दिवस आधी आला. केरळमध्ये त्याचे आगमन 31 मे ते 4 जून यादरम्यान कधीही होऊ शकते, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून हवामान विभागाच्या नियोजित तारखेप्रमाणे दरवर्षी 20 मे रोजी येत असतो. यंदा तो नियोजित तारखेच्या एक दिवस आधीच अंदमानात दाखल झाला. पुढे 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात, 25 जून रोजी राजस्थान आणि 6 जुलैपर्यंत मध्य प्रदेशात तो पोहोचण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात 18 ते 25 जूनपर्यंत आणि बिहार-झारखंडमध्ये 18 जूनपर्यंत मान्सून पोहोचेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मान्सून मालदीव आणि कोमोरिनसह दक्षिण उपसागरात प्रवेश केला. निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात तो दाखल झाला. त्यामुळे त्या भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
मान्सूनचे वारे वेगाने सुरुवातीला बंगालच्या उपसागरात ईशान्येकडे सरकून नंतर मध्यवर्ती भागांवर केंद्रित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 24 मेच्या सुमारास बंगालच्या उपसागरात तीव— कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून अधिक वेगाने पुढे जाण्यास मदत होईल, असाही अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
या राज्यांत उष्णतेची लाट
राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीच्या अनेक भागांत उष्णतेची लाट पसरली आहे. राजस्थानातील बाडमेर आणि कानपूरमध्ये सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले.
…या भागांत पाऊस
केरळ, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, उपहिमालयीन रांगा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालयात पाऊस सुरू झाला आहे.
महाराष्ट्रात 25 मेपर्यंत पाऊस
सोमवारपासून (दि. 20 मे) राज्यात सर्वत्र विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारे अन् पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूून वाऱ्यांची अनुकूलता, त्याचा वेग, या बाबी यंदा खूप सकारात्मक आहेत. तो यंदा नियोजित तारखेच्या एक दिवस आधीच आला. त्याचा पुढचा वेग कमी दाबाच्या पट्ट्यावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे तो केरळात 31 मे ते 4 जून या कालावधीत कधीही येऊ शकतो. त्याची अनुकूलता पाहता यंदा तो 1 जूनपूर्वीच केरळात येण्याची शक्यता जास्त दिसत आहे.
– माणिकराव खुळे, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे
यंदाच्या मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. रविवारी तो मालदीव, कामरून, अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरात दाखल झाला. 22 मेपासून त्याला पुन्हा बळकटी येईल तसेच 25 मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळेसुध्दा मान्सूनची गती वाढेल
– अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभागप्रमुख, पुणे
गत तीन वर्षांतील मान्सूनची एन्ट्री
2020 मध्ये मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.
2021 मध्ये 3 जून रोजी, तर 2022 मध्ये 29 मे रोजी दाखल झाला होता.
2023 मध्ये 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.
‘ला निना’मुळेयंदा चांगला पाऊस
एल निनो आणि ला निना या हवामानाच्या दोन परिस्थितींचा परिणाम पावसावर होतो. गतवर्षी एल निनो सक्रिय होता, तर या वेळी एल निनो या आठवड्यात आटोपला आहे. येत्या 3 ते 5 आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होणे शक्य आहे. गतवर्षी ‘एल निनो’दरम्यान सरासरीहून कमी म्हणजे 94 टक्केच पाऊस झाला होता.
पावसाची सरासरी काय?
चार महिन्यांच्या पावसाळ्यासाठी दीर्घ कालावधीची सरासरी 86.86 सें.मी. आहे.
याचा अर्थ असा की, पावसाळ्यात इतका एकूण पाऊस झाला पाहिजे.
यावर्षी सरासरीहून अधिक म्हणजे 106 टक्के (87 सेंमी) पाऊस शक्य आहे.
हेही वाचा
पावसाने केला राजस्थानचा घात
Swati Maliwal : स्वाती मालीवाल प्रकरणी केजरीवाल गप्प का? : भाजपचा सवाल
Arvind Kejriwal : पंतप्रधान मोदींना आम आदमी पक्ष संपवायचा आहे : अरविंद केजरीवाल