चिराग-सात्त्विक जोडीने रचला इतिहास
बँकॉक; वृत्तसंस्था : सात्त्विकराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅडमिंटन जोडीने थायलंड ओपन पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात चीनची जोडी चॅन बो यँग आणि लियू यी चा पराभव केला. चिराग अन् सात्त्विकने चीनच्या जोडीचा 21-15, 21-15 अशा सरळ गेममध्ये पराभव करत आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला. चिराग अन् सात्त्विकसाठी थायलंड हे एक खास ठिकाण आहे. त्यांनी त्यांचे पहिली सुपर 500 विजेतेपद थायलंडमध्येच 2019 ला जिंकले होते.
अंतिम सामन्यात भारतीय पुरुष जोडीने सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड निर्माण केली होती. विशेष म्हणजे या संपूर्ण आठवड्यात या जोडीने एकही गेम गमावलेला नव्हता. जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीने 2024 मधील आपले दुसरे वर्ल्ड टूर टायटल जिंकले. यापूर्वी त्यांनी मार्च महिन्यात फ्रेंच ओपन टायटल जिंकले होते. चिराग अन् सात्त्विकची ही यंदाच्या हंगामातील चौथी फायनल होती. सात्त्विक – चिरागने 2019 च्या स्पर्धेत थरारक विजय मिळवला होता. आता या आठवड्यात मात्र त्यांनी थायलंडमध्ये सहज विजय मिळवले. त्यांनी यापूर्वीच्या जोड्यांचा एकही गेम न हरता पराभव केला. त्यांनी स्पर्धेत सर्वाधिक 16 पाईंटस् विरोधी जोडीला घेऊ दिले होते.