धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान
धुळे; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यातील पाचव्या टप्प्यात धुळे लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी (दि.२०) मतदान होणार आहे. सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्त व राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण १७ हजार ३४१ मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्य घेवून त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचले असून उद्या सहा विधानसभा मतदार संघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात १९६९ मतदान केंद्र
धुळे लोकसभा मतदारसंघात १ हजार ९४८ मुळ मतदान केंद्र तर २१ सहाय्यकारी मतदान केंद्र असे एकूण १ हजार ९६९ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वितरीत करण्यात आले. ९८६ मतदान केंद्रावर वेबकॉस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १३ मतदान केंद्र शॅडो मतदान केंद्र आहेत. याठिकाणी वॉकीटॉकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी १५३ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून १७ अतिरिक्त अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहे.
आरोग्य व अत्यावश्यक सुविधा
निवडणूक मतदानासाठी प्रशासन सर्वतोपरी सिद्ध झाले आहे. मतदार संघात तापमानाची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ, गरोदर महिला, लहान बालकांच्या माता असलेल्या महिला मतदारांसाठी व लहान मुलांसाठी पाळणाघर आदी व्यवस्था असून अंगणवाडी, बालवाडी सेविका, मदतनीस तैनात केलेल्या आहेत. तसेच अन्य मतदारांसाठी उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून सावलीसाठी मंडप, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, आपत्कालीन प्रसंगी रूग्णवाहिका आदी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१८ उमेदवार निवडणूक रिंगणात
धुळे लोकसभा मतदार संघात १८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर दोन इव्हीएम चा वापर केला जाणार आहे.
पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त
मतदान प्रक्रिया सुव्यवस्थितरित्या व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडून देखील पूर्ण तयारी करण्यात आली आहे. यात प्रत्येक ईव्हीएम मशीन सोबत एक पोलीस आणि होमगार्ड तैनात आहेत. तसेच मतदान केंद्राच्या बाहेर १०० मीटर अंतरावर देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय स्ट्रायकिंग फोर्स आणि अन्य पथक असे सोळा पथक तयार करण्यात आले असून बारा निरीक्षण पथक आणि बारा फिरते पथक देखील तैनात करण्यात आले आहेत. या सर्व बंदोबस्तावर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार आहे. विशेषता आवश्यक ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण देखील केले जाणार आहे.
जनजागृती व मतदार चिठ्ठीचे वाटप
या निवडणुकीत मतदानाचा टक्क वाढावा, याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशान नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाच्या सुचनांनूसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात तर धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी भागात अधिकारी, कर्मचारी यांनी गृहभेटीद्वारे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली असून या मतदार संघात बीएलओ मार्फत १९ लाख १८ हजार ८३१ मतदारांना मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात आले असून ४ लाख ८० हजार ८७७ घरांना वोटर गाईडचे वाटप करण्यात आले आहे.
हेही वाचा :
Dhule Lok Sabha | मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सर्वंकष प्रयत्न करा : मुख्य निवडणूक अधिकारी
Nashik News | नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
अकोला : मतमोजणीची पूर्वतयारी नियोजनपूर्वक करावी; निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार