बीड : बालकाच्या मृत्यूमुळे डॉक्टरांना मारहाण; दोघांना अटक
केज; Bharat Live News Media वृत्तसेवा : दीड वर्षाच्या बालकाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.१९) उघडकीस आली. मारहाण करून पळून जाणाऱ्या दोघा संशयितांना केज पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ताब्यात घेतले. याप्रकरणी सोमेश्वर भीमराव खाडे (रा. केंद्रेवाडी, ता. अंबाजोगाई) आणि रामप्रभू बाबासाहेब केंद्रे (रा. केकतसारणी ता. केज) या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, अनिकेत राहुल केंद्रे या दीड वर्षीय बालकावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्याची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे रविवारी (दि.१९) डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, नातेवाईकांनी त्याला रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथे घेऊन जात होते. मात्र अर्ध्या वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या बालकाचे संतप्त नातेवाईक केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आले. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. घुगे हे सरकारी रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये चहा पीत होते. त्यावेळी मृत बालकाचे नातेवाईक सोमेश्वर भीमराव खाडे (रा. केंद्रेवाडी ता. अंबाजोगाई) आणि रामप्रभू बाबासाहेब केंद्रे (रा. केकतसारणी, ता. केज) हे दोघांनी त्या ठिकाणी जात डॉ. घुगे यांना मारहाण केली. तसेच त्यांना मारण्यासाठी दगड उचलले. दरम्यान तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी भांडण सोडविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस जमादार त्रिंबक सोपने, पोलीस नाईक शिवाजी कागदे हे घटनास्थळी आले. पोलिस दिसताच दोघे संशयित पळाले. पोलिसांनी ६ कि.मी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.
राग एकावर अन् मारहाण दुसऱ्याला!
मयत अनिकेतवर दुपारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सावंत हे उपचार करीत होते. नातेवाईकांचा राग हा डॉ सावंत यांच्यावर होता. मात्र नातेवाईक जेव्हा सायंकाळी ६:०० वा. उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. घुगे हे कर्तव्यावर होते. नातेवाईकांनी डॉ. सावंत समजून डॉ. घुगे यांना मारहाण केली.
हेही वाचा :
कोल्हापूर : आदित्यच्या अपघाती मृत्यूने धरणग्रस्त वसाहत सुन्न…
बीड : गाढ झोपेत असताना अंगावरून गेला टिप्पर; २ तरूणांचा मृत्यू
बीड : आई-बापाने लाथाडले, नातेवाईकांनी नाकारले, तीन चिमुकले ‘सैरभैर’