कोल्हापूर : आदित्यच्या अपघाती मृत्यूने धरणग्रस्त वसाहत सुन्न…
खोची, Bharat Live News Media वृत्तसेवा : सुन्न धरणग्रस्त वसाहत, निशब्द वडील आणि मृत्यूशी झुंज देत असलेली आई सारिका. अशी अवस्था झाली आहे, खोची नानिवळे येथील अपघातात मृत्यू झालेल्या आदित्यच्या कुटुंबाची. तर वडील संभाजी यांना हातातोंडाशी आलेल्या मुलाच्या कायमच्या जाण्याचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला बायकोची आयुष्याशी चाललेली झुंज पहावी लागत आहे.
अपघात कसा घडला ?
आदित्य जाधव आजारी आईला भेंडवडे येथे दवाखान्यात घेऊन जात होता.
भेंडवडे येथे ट्रकची दुचाकीला धडक
आदित्यचा जागीच मृत्यू झाला.
सारिका जाधव गंभीर जखमी झाल्या.
भेंडवडे येथे शुक्रवारी (दि.१९) भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील आदित्य संभाजी जाधव (वय २२) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर आई सारिका गंभीर जखमी झाल्या. सारिका यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २२ वर्षीय उमद्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजल्यापासून वडील संभाजी जाधव निशब्द आहेत. आदित्य हा वाणिज्य शाखेच्या पदवीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता. तसेच भारतीय लष्करात भरती होण्यासाठी त्याची दिवस- रात्र मेहनत सुरू होती. घरी लष्करी सेवेची परंपरा असल्यामुळे कुटुंबाचा त्याला मोठा पाठिंबा होता, मात्र हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्याने जगाचा निरोप घेतला.
अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला
ट्रकचा वेग एवढा जबरदस्त होता की धडकेनंतर या ट्रकने दुचाकीला तीस फुटाहून अधिक अंतर फरपटत नेले. यात दुचाकींचा चक्काचूर झाला. यादरम्यान पेट्रोलची टाकी फुटल्याने दुचाकीला आग लागली. घटनास्थळी उपस्थित तरुणांनी प्रसंगावधान राखत गाडी बाहेर काढून आग विझवली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
खोची- पेठवडगाव रस्त्यावर वाहने वेगात चालवली जात आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात वारंवार घडू लागले आहेत. वेगाची गती कमी करण्यासाठी गावालगत, चौक, शाळा परिसर येथे गतिरोधक करण्याची मागणी वारंवार ग्रामस्थांतून केली जात आहे. परंतु, ठेकेदाराकडून याला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. अपघात, धोक्याची सूचना देणारे फलक याठिकाणी लावण्याची गरजआहे. अगोदरच गतिरोधक बनविले असते तर एका युवकाचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत होती.
हेही वाचा :
हृदयद्रावक| कोल्हापुरात आजारी आईला दवाखान्यात नेताना युवकाचा अपघाती मृत्यू; आई गंभीर जखमी
रत्नागिरी : गणपतीपुळेहून मुंबईकडे जाताना उक्षी घाटात ट्रॅव्हल्सला अपघात, 1 गंभीर, 2 जखमी
छत्रपती संभाजीनगर : कन्नड येथे अंबाडी प्रकल्पाजवळ कार-ट्रॅक्टरचा अपघात; एक महिला ठार