धाराशिव: कळंब येथील दुकानात दरोडा, शरीराला तेल लावलेला दरोडेखोर सापडला
कळंब, Bharat Live News Media वृत्तसेवा: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर व अण्णा भाऊ साठे चौकातील गणेश ट्रेडर्स या दुकानावर व मालक ब्रिजलाल भुतडा यांच्या राहत्या घरी रविवारी (दि.१९) पहाटे दोनच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यामधील आठ ते दहा दरोडेखोर असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरोडेखोर अंडरवेअरवर होते. त्यांनी शरीराला तेल लावलेले होते.
नेमकं काय घडलं?
रात्री दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले.
दरोडेखोरांनी शटर तोडून दुकानात प्रवेश केला.
गल्ल्यातील ४ हजार, १ लाखाचे सोने व दीड लाखाची रोकड घेतली.
एक दरोडेखोर पाय अडकून पडला.
कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला
याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. त्यानंतर शटर तोडून दुकानात प्रवेश केला. काऊंटर उचकटून गल्ल्यातील ४ हजार घेतले. त्यानंतर दुकानाच्या वर असलेल्या घरात प्रवेश केला. हॉल, बेडरूम मधील कपाटे फोडून १ लाखाचे सोने व दीड लाखाची रोकड लांबवली.
दरम्यान, घरामध्ये आवाज येत असल्याची जाणीव भुतडा पती- पत्नीला झाली. ते बाहेर आले यावेळी दरोडेखोरांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी भुतडा यांचा मुलगा लक्ष्मीकांत व सून सुनिता बाहेर आले. त्यावेळी दरोडेखोर पळाले. परंतु, एक दरोडेखोर पाय अडकून पडला. त्याला भुतडा आणि त्यांच्या मुलाने पकडले. घरातील महिलांनी फोन करून नागरिकांना बोलावले. पोलीस दाखल झाले. यावेळी भुतडा यांच्या हाताला जखम झाली. त्यांच्यावर कळंब येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेबाबत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे करत आहेत.
भूम येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ, पोलीस निरीक्षक रवि सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. या दरोड्यामध्ये ८ ते १० दरोडेखोर असावेत, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी सांगितले.
हेही वाचा
Dharashiv Lok Sabha | धाराशिवमध्ये दीर आणि भावजय यांच्यात लढत
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान जरांगे-पाटील यांची तब्येत बिघडली
धाराशिव : महायुतीकडे इच्छुकांची गर्दी