शोध सुखाचा ! : ‘ती’ आणि ‘तो’

सुजाता पेंडसे
आज सर्वत्र आपण लग्नाबद्दलच्या ज्या चर्चा ऐकतो, त्यामध्ये लग्न न जमणे व लग्न न टिकणे या दोन गोष्टी सातत्याने ऐकायला येतात. लग्न न जमणे या एकाच गोष्टीत खूप काही वेगळ्या गोष्टीही कानावर पडतात. जसे की मुलींचे भरपूर शिक्षण, उत्तम करिअर यामुळे त्यांचे आई-वडील आणि मुली यांच्या वाढलेल्या अपेक्षा. स्वत:च्या बरोबरीचाच नव्हे तर वरचढ शिक्षण, उत्पन्न असलेला ‘वर’ असावा ही रास्त अपेक्षा असली तरी आजकाल मुली ज्या वयात लग्न करायला तयार होतात, त्याहून वयाने अगदी थोडाच मोठा वर त्यांना हवा असतो. शिवाय त्या वयापर्यंत तो पूर्णत: सेटल म्हणजे स्वत:चे सुसज्ज घर, भरपूर उत्पन्न, कार वगैरे तर असावीच.
शिवाय शेती, बँक बॅलन्स वगैरेही हवंच, अशा ‘परिपूर्ण वरा’च्या शोधात मुली आणि पालक असतात. पूर्वी प्रत्येक मुलाला गोरी, सुंदर बायको हवी असायची, तसेच आता मुलींना ‘परिपूर्ण वर’ हवा असतो. यातून जी लग्नं जमतात, त्यांचा संसार सुरू तर होतो; पण पुढे टिकतो किती, टिकतात त्यांचं बाँडिंग खरोखर पूरक आहे का, हा संशोधनाचाच विषय आहे. ‘लग्न’ नावाचा इव्हेंट प्रचंड पैसा खर्च करून अत्यंत अविस्मरणीय आणि हटके असावा, असा प्रयत्न सगळे करतात. परंतु तितकीच मेहनत लग्न टिकवण्यासाठी केली जाते का, याचं उत्तर तेच लोक देऊ शकतील.
थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की, लग्न करण्यापूर्वी आणि लग्न टिकावं, आनंदानं संसार करावा यासाठी मुद्दाम काही प्रयत्न करावे, अशी सामाजिक गरज निर्माण झालीय. त्याकरिता स्वत:ला म्हणजे ज्यांना ही गरज आहे, त्यांनी काय काय करायला हवं? त्यासाठी ‘खरे लग्न’ म्हणजे काय याची आधी व्याख्या समजून घ्यायला हवी. लग्न कशासाठी करतो आहोत, या लग्नातून काय अपेक्षा आहेत, स्वत:कडून, जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत, त्या आपण दोघेही कशा पूर्ण करणार आहोत? तडजोड, माया, आपुलकी, सुसंवाद आणि माणूस म्हणून दुसर्याला समजून घेणं या अगदी बेसिक गोष्टी आपल्याकडे आहेत का, हा सगळा विचार लग्नापूर्वी व्हायला हवा.
आजच्या मुला-मुलींना सगळ्या बाबतीतलं शहाणपण असतं. परंतु ‘लग्न’ हा फक्त इव्हेंट नसून आयुष्यभराची कमिटमेंट आहे, हे पक्कं लक्षात ठेवायला हवं. ‘मीच का?’असा प्रश्न न पडता ‘कधी तू…कधी मी’ इथपर्यंत पोहोचण्याची तयारी हवी. लग्न ही अत्यंत जबाबदारीने करण्याची गोष्ट असून ‘टिकलं तर टिकलं नाहीतर होऊ वेगळं’, असा विचारही मनात असता कामा नये. अर्थात हिंसाचार, छळ अशासारख्या गोष्टी सहन कराव्यात, असे मात्र मुळीच नाही. परंतु मोडलेल्या लग्नाला तुम्ही कारण असावे, असे नक्कीच व्हायला नको.
वैवाहिक समस्यांच्या बाबतीत तुमचे सुप्त मन काय मदत करू शकते, याबाबत आता जाणून घेऊया. सुप्त मनाकडून काय काय घडू शकतं, हे एव्हाना तुम्हाला चांगलं समजलं असेल. विवाहापूर्वीच तुम्ही सुप्त मनाची मदत घ्यायला हवी. म्हणजे तुम्ही लग्नाच्या वयाचे होत आलेला असता, अशावेळी तुम्ही पत्नी कशी हवी किंवा पती कसा हवा, याचे चित्र मनाशी रेखाटलेले असते. पण ते अंदाजे चित्र इथे उपयोगी नाही. समजा, एक मध्यम उत्पन्न असलेला मुलगा आहे (अशांची लग्नं होणं सध्या अत्यंत अवघड झालंय). त्याला हातभार लावेल अशी मुलगी हवीय किंवा त्याला नेमकं काय काय हवंय, हे त्यानं सरळ एकदा कागदावर लिहून काढावं. अर्थात त्याच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या वास्तवाला धरून असाव्यात. हास्यापद आणि या जगात जे उपलब्ध नाही, असे काही नसावे.
त्या सर्व अपेक्षांची छोटी छोटी वाक्ये बनवावी, जी सहज लक्षात राहतील व म्हणायला सोपी पडतील. तो कागद नेहमी दृष्टीला पडेल अशा ठिकाणी ठेवावा. त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या शांत ठिकाणी, शांत वेळी जी वाक्ये आहेत, त्याचे मनोमन, पूर्ण उत्कटतेने त्यांची उजळणी करावी. सकाळची वेळ म्हणजे शक्यतो पहाटेची वेळ. जेव्हा तुमच्या इतर जाणिवा शांत असून मनही शांत असते. त्यावेळेस केलेले विचार सुप्त मनात सहजपणे पोहोचतात. तसेच रात्री झोपण्यापूर्वी जे विचार कराल, तेही सुप्त मनात लवकर पोहोचतात. मनातले इतर विचार अशावेळी पूर्णत: बाजूला करायचे.
मन अत्यंत चंचल असतं. एखाद्या अवखळ लहान मुलालाही गप्प बसवता येईल; पण मनाला ताब्यात ठेवणं महाकठीण असतं. कारण ते वर्तमानात, तुम्ही असता त्या ठिकाणी थांबत नाही. वायुवेगाने इतस्तत: भटकत असते. म्हणून आधी सुखासनात बसून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. मन श्वासावर केंद्रित झाले की, मग तुम्ही तुमच्या अपेक्षांची वाक्ये शांतपणे, ठामपणे आणि मनापासून म्हणावीत. तसेच मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हवे तसे ‘कल्पनाचित्र’ एखादा आवडता सिनेमा पाहताना ज्या तल्लीनतेने काही क्षण त्यातल्या पात्रांशी एकरूप होता, तसेच या कल्पनाचित्रात रममाण होऊन जा. त्याक्षणी त्या दोनच गोष्टी खर्या. एक तुम्ही आणि तुमची चित्रमालिका. ही चित्रं अतिशय डिटेलिंग केलेली असावीत आणि विश्वासाने पाहात राहावी. जितक्या समरतसेने कराल, तितके परिणाम दिसतातच. हे झाले विवाहपूर्व गोष्टींबद्दल. मात्र ज्यांच्या वैवाहिक जीवनात आधीच खूप समस्या आहेत, त्यांनी काय करायचं? उदाहरण घेऊया.
एका माणसाला त्याची पत्नी आपल्यापेक्षा सर्व बाबतीत वरचढ आहे, ती आपल्याला कधीही सोडून जाईल ही भीती सतावायची. सारखा हाच विचार केल्याने त्याच्या हातून चुकीचे वर्तन होत राहिले. नकळत संशय घेणे, तिच्याशी वागताना नको इतके प्रेमळ वागणे, जे तिला संशयास्पद वाटायचे. असे घडता घडता एक दिवस पत्नीने खरंच त्याच्याकडे घटस्फोट मागितला. तो प्रचंड अस्वस्थ झाला. जे घडायला नको होते, तेच अखेर घडले.
या घटनेत तो माणूस त्याला काय नको आहे, याचेच चित्र नकळतपणे रंगवत राहिला. त्याच्या मनातली भीती त्याच्या हातून चुकीच्या गोष्टी घडवत राहिली आणि जे घडू नये तेच समोर आले. जे पेराल ते उगवते या न्यायाने त्याला त्या अनुभवाला सामोरे जावे लागले. जे त्याच्या मनात वेगवेगळ्या प्रकारे पण सतत येत होते. पुढे त्याला ‘आकर्षणाचा नियम’ समजला आणि त्याने त्या पद्धतीने प्रयत्न केले. मनोमन जसे तो योग्य त्या स्वयंसूचना देत राहिला. हवे ते कल्पनाचित्र रंगवत राहिला. त्याच बरोबर प्रत्यक्षात स्वतः पत्नीला भेटून, तिच्याशी बोलून, काही जवळच्या लोकांची मदत घेऊन त्याने त्याला हवे ते साध्य केले. आपल्या मनात तिच्याविषयी नेमक्या काय पुढे भावना आहेत, हे तिला दाखवून देण्यात तो यशस्वी झाला. मग पुढे त्यांचे आयुष्य सुखाचे गेले.
या सर्वांबरोबरच मनोमन तुम्ही जसे दुसर्या व्यक्तीबद्दलचे चित्र रंगवता, तसेच स्वतःवरही काम करणे तितकेच आवश्यक आहे. तुमच्या चुकांकडे अलिप्तपणे पाहून त्या दुरुस्त करण्यासाठीही हेच तंत्र अंमलात आणावे लागते. कारण ‘बदल नेहमी दुसर्याने करावेत’ हा विचारही एकांगी आणि चुकीचा आहे. स्वतःमध्येही चांगले बदल घडून येण्यासाठी जे चूक वाटते ते सर्व लिहून काढा, त्यात काय बदल अपेक्षित आहे, ते लिहा. स्वतःला वेळेचे टार्गेट द्या आणि वारंवार त्याची उजळणी करा. मनाला एकाच फटक्यात शिस्त लागली असे कधी होत नाही. दरवेळी त्याला धरून आणून हवे ते करवून घ्यावे लागते. अर्थात हे सगळे कशासाठी करायचे तर स्वतःसाठी. म्हणजे ‘मी’साठी. ‘मी’ तर सर्वांनाच प्रिय असतो. त्यामुळे सुखी वैवाहिक जीवनासाठी ‘ती’ आणि ‘तो’ दोघांनीही ‘मी’वर काम करायला हवे. तरच हवे ते मिळू शकेल.
