तब्बल 3400 वर्षांनंतर इजिप्शियन राजाला पुन्हा मिळाला चेहरा!

कैरो : प्राचीन काळातील अनेक व्यक्तींचे चेहरे कसे होते याचे एक कल्पनाचित्र त्यांची कवटी व अन्य अवशेषांचा अभ्यास करून बनवले जात असते. आता संशोधकांनी अमेनहोटेप तिसरा, जो इसवी सन पूर्व 14 व्या शतकात इजिप्शियन फेरो म्हणजेच राजा होता, त्याच्या ममीचा वापर करून चेहरा तयार केला आहे. गेल्या 3400 वर्षांत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अमेनहोटेपचा …

तब्बल 3400 वर्षांनंतर इजिप्शियन राजाला पुन्हा मिळाला चेहरा!

कैरो : प्राचीन काळातील अनेक व्यक्तींचे चेहरे कसे होते याचे एक कल्पनाचित्र त्यांची कवटी व अन्य अवशेषांचा अभ्यास करून बनवले जात असते. आता संशोधकांनी अमेनहोटेप तिसरा, जो इसवी सन पूर्व 14 व्या शतकात इजिप्शियन फेरो म्हणजेच राजा होता, त्याच्या ममीचा वापर करून चेहरा तयार केला आहे. गेल्या 3400 वर्षांत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अमेनहोटेपचा चेहरा पुन्हा तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अहवालानुसार, अमेनहोटेप इसवी सन पूर्व 14 व्या शतकात खूप शक्तिशाली होता. इजिप्तमध्ये त्याची देवाप्रमाणे पूजा केली जात असे. त्याच्या नेतृत्वाखाली इजिप्तचा विकास तर झालाच पण तो आंतरराष्ट्रीय स्तरावर महासत्ता म्हणून उदयास आला.
न्यूयॉर्क पोस्टनुसार, शास्त्रज्ञांनी त्याचा चेहरा तयार करण्यासाठी ममीच्या कवटीचा अभ्यास करून डेटा गोळा केला. रिक्रिएशन टीममध्ये ब्राझिलियन ग्राफिक्स डिझायनर्सचाही समावेश होता. अमेनहोटेप हा इजिप्शियन राजा हा तुतानखामेनचा आजोबा होता. तो इजिप्तच्या 18 व्या राजवंशाचा भाग होता. त्याने आपल्या राजवटीत मध्यपूर्वेत अनेक मंदिरे बांधली. त्याचे नाव सूर्य आणि वार्‍याच्या देवता अमूनच्या नावावर ठेवले गेले. त्याच्याकडे अमाप संपत्ती होती, असा अंदाज त्याच्या राजनैतिक पत्रांवरून येतो. ऑस्ट्रेलियन पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणाले की, अमेनहोटेपची ममी पाहून त्यावर सोन्याचा लेप आहे असा अंदाज लावला जाऊ शकतो. याद्वारे ममी देवाची मूर्ती म्हणून ठेवण्यात आली होती. तज्ज्ञांनी नोंदवले की अमेनहोटेप तिसरा एक लठ्ठ आणि आजारी माणूस होता. त्याच्या डोक्यावर केस नव्हते आणि त्याला दातांचा त्रासही होता.
अमेनहोटेपच्या ममीच्या अभ्यासातून असे दिसून आले की त्याची उंची अंदाजे 156 सेमी (5 फूट 1 इंच) असेल. यासह, तो त्या काळातील सर्वात कमी उंचीचा राजा होता. 1352 इसपूर्व 40-50 व्या वर्षी अमेनहोटेपचा मृत्यू झाला. 2021 मध्ये, शास्त्रज्ञांनी अमेनहोटेपची ममी व्हर्च्युअली उघडली. याचा अर्थ, शास्त्रज्ञांनी संगणकाच्या मदतीने या ममीचे अवशेष तपासले होते. यासाठी थ्रीडी स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यावेळी राजाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा सर्व तपशील जाणून घेण्यात आला. अमेनहोटेपची ही ममी 1881 मध्ये सापडली होती. तथापि, ही ममी इतकी नाजूक आहे की शतकांनंतरही शास्त्रज्ञांनी ती पूर्णपणे उघडण्याची हिंमत केलेली नाही, अमेनहोटेपची ममी फुलांच्या माळा आणि लाकडी मुखवटाने सजलेली आहे. त्याकाळी राजांना त्यांच्या मृत्यूनंतर अशाप्रकारे सजवून पुरले जात असे.