आप नेत्यांचा भाजप कार्यालयाला उद्या घेराव, स्वतः केजरीवालही उपस्थित राहणार
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसह उद्या (दि.19) भाजप कार्यालयात जाणार आहेत. “भाजपने तुरुंगाचा खेळ खेळू नये, आमच्या ज्या नेत्याला तुरुंगात टाकायचे आहे, त्या नेत्याला तुरुंगात टाका. उद्या १२ वाजता मी तुमच्या कार्यालयात येतो,” असा इशारा केजरीवाल यांनी भाजपला दिला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी (दि.18) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की “भाजप तुरुंग- तुरुंगाचा खेळ करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उद्या १२ वाजता भाजप कार्यालयात जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी नेत्यांना अटक करू शकतात,” असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला.
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणानंतर केजरीवालांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना अटक करण्यात आली. “यानंतर दिल्ली सरकारमधील मंत्री अतिशी आणि खासदार राघव चढ्ढा यांनाही अटक करण्यात येईल, असा दावा केजरीवाल यांनी केला. केजरीवाल म्हणाले की त्यांच्या पक्षातील नेत्यांना तुरुंगात पाठवून पक्ष चिरडला जाऊ शकत नाही. एवढ्या नेत्यांना तुरुंगात टाकाल तेवढे अनेक नवे नेते पक्षात तयार होतील,” असेही ते म्हणाले.