सोलापूर: नातेपुते येथे किरकोळ कारणावरून दोघांचा खून; संशयित फरार
नातेपुते: Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना नातेपुते- फोंडशिरस रस्त्यावरील महादेव मंदिरजवळ शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली. नारायण विठ्ठल जाधव (वय ४२), दुर्योधन नवनाथ निकम (वय २२, दोघे रा. दहिगाव, चिकणे वस्ती) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. संशयित आरोपी फरार झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेले माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी २ वाजता नातेपुते येथील सत्यजित परमिट रूम येथे मुख्य संशयित अक्षय उर्फ चिवळ्या संजय बोडरे (रा. फोंडशिरस) व त्याचा साथीदार यांनी नारायण जाधव याला दारूच्या नशेत अर्वाचे भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली होती. याचा राग मनात धरून जाब विचारण्यासाठी नारायण आणि दुर्योधन निकम यांनी बाळू कुंडलिक जाधव, विनोद पोपट गोरे, अक्षय बोडरे यांच्या गाडीचा पाठलाग करत नातेपुते – फोडशिरस रस्त्यालगत असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ गेले.
येथे अक्षय बोडरे व त्याच्या ६ साथीदारांनी दगड, विटांनी मारहाण करत नारायण जाधव व दुर्योधन निकम यांना जखमी केले. त्यानंतर अक्षय याने नारायण याच्या छाती, काखेखाली वार केले. तसेच दुर्योधन याच्या बरकडीवर धारधार शस्त्राने सपासप वार करत खून केला. यामध्ये दोन जण गंभीर जखमी होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर अक्षय बोडरे साथीदारासह घटनास्थळावरून फरार झाला.
दुर्घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शेगावकर, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा तपास नातेपुते पोलिस ठाण्याचे प्रभारी महारूद्र परजणे करत आहेत. संशयितांच्या शोधासाठी दोन पथके तयार केली आहेत.
ही घटना किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत घडली आहे. पोलिस प्रशासन आरोपीच्या मागावर असून यांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील. कोणीही घबराटीच्या अफवा पसरवू नये. वेगवेगळ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये.
– महारूद्र परजणे, नातेपुते पोलिस ठाणे प्रभारी
हेही वाचा
सर्वोच्च न्यायालयाचा सोलापूर महापालिकेला दिलासा
सोलापूर : मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू
सोलापूर : राळेरास येथे वीज पडून बैल ठार; शेतकऱ्यावर ओढवले संकट