Crime news | ज्येष्ठाला जिवे मारण्याचा प्रयत्न; सावकाराची येरवडा कारागृहात रवानगी
भिगवण : Bharat Live News Media वृत्तसेवा : सावकारी व्याजाच्या पैशातून ज्येष्ठ व्यक्तीस जबर मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्या मदनवाडी येथील सावकार नामदेव बंडगर याला इंदापूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. याबाबत नामदेव बंडगर व त्याच्या दोन साथीदारांविरोधात भिगवण पोलिसात दि.5 मे रोजी भादंवि कलम 325, 327, 342, महाराष्ट्र सावकारी अधिनियम आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तसेच मारहाण झालेल्या जीवन क्षीरसागर यांच्या पुरवणी जबाबानंतर पुन्हा बंडगर याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न 307 चे कलम लावण्यात आले होते. बंडगर याला रविवारी (दि.12) अटक करून इंदापूर न्यायालयात हजर केले.
त्या वेळी त्याला न्यायालयाने पाच दिवसांची, दि.16 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. दीड लाख रुपयांचे तीन लाख फेडले तरीही अजून दीड लाख रुपयांची मागणी करून भिगवण येथील जीवन क्षीरसागर या ज्येष्ठ व्यक्तीस खासगी सावकार नामदेव बंडगर व त्याच्या दोन साथीदारांनी दि.4 मे रोजी डांबून ठेवत बेदम मारहाण केली होती. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली होती. यावरून बंडगर व त्याच्या साथीदारांविरुद्ध प्रा. तुषार क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिगवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वेश्या व्यवसाय प्रकरणीही बंडगर याच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल आहे.
राजकीय राळ उठली, तरीही सावकारीचा उन्माद
दरम्यान, लोकसभेच्या तोंडावर गेल्या महिन्यात एका बड्या राजकीय दादांनी मोक्कातील आरोपीला कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून एकदा सोडवले, पण परत नाही, असे भरसभेत सांगितले होते. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनीही नाव जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर पडदा पडला होता. परंतु, या प्रकरणात नामदेव बंडगरच असल्याची चर्चा आहे. दादांनी सोडवल्यानंतरही लगेचच गुन्हा घडल्याने सावकारीचा उन्माद किती टोकाला गेला आहे याची प्रचिती यातून पुढे आली आहे.
हेही वाचा
जागतिक वस्तुसंग्रहालय दिन : शहरातील पाच संग्रहालयांत जतन केला जातोय अनमोल ठेवा
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निर्धार सभेत तपास यंत्रणेचा निषेध
दहशतवादी सलीम कुत्ता पार्टी प्रकरण : बडगुजर तडीपारीविरोधात आज मांडणार बाजू