निधीअभावी केळकर संग्रहालयाचा विस्तार रखडला..!
सुवर्णा चव्हाण
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले राजा दिनकर केळकर संग्रहालय म्हणजे पुण्याची ओळख….याच संग्रहालयाच्या विकासाकरिता आणि विस्ताराकरिता काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने बावधन बुद्रुकमध्ये सहा एकर जमीन संग्रहालय व्यवस्थापनाला दिली खरी, पण गेल्या अनेक वर्षांपासून संग्रहालयाच्या विकासाचा आणि विस्ताराचा हा प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 89 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळाने पाठपुरावा करूनही राज्य सरकारमार्फत प्रकल्पासाठी अद्यापही निधी मंजूर झालेला नाही.
त्यामुळे निधीअभावी अजूनही प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. पुण्याच्या शुक्रवार पेठेत राजा दिनकर केळकर संग्रहालयाची स्थापना डॉ. दिनकर गंगाधर केळकर यांनी केली. शंभर वर्षांहून अधिक जुन्या या संग्रहालयात सुमारे 25 हजारांहून अधिक जुन्या आणि दुर्मीळ वस्तू आहेत. डॉ. दिनकर केळकर यांच्या संग्रहातील विविध प्रकारच्या मूर्तींपासून ते विविध दिव्यांपर्यंतचा संग्रह याठिकाणी आहे. हजारो पर्यटक संग्रहालयाला भेट देतात. पर्यटक आपल्याजवळील संग्रहित वस्तूही संग्रहालयाला भेट देत आहेत. संग्रहालयातील संग्रहित वस्तूंची संख्या दिवसागणिक वाढत असून, ते प्रदर्शित करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही, या कारणास्तव संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळाने राज्य सरकारकडे संग्रहालयाच्या विकास आणि विस्तार प्रकल्पासाठी जमीन मागितली होती.
2002 ते 2005 या काळात बावधन बुद्रुकमध्ये संग्रहालयास जमीन मिळाली आहे. परंतु, केवळ निधीअभावी प्रकल्प रखडला असून, प्रकल्पाचे काम अद्यापही सुरू होऊ शकलेले नाही. संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळाकडून पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकारकडे आताही याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 25 कोटी रुपयांचा निधी तरी मिळावा, अशी मागणी संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. आज शनिवारी (दि. 18) साजर्या होणार्या जागतिक संग्रहालय दिनानिमित्त दैनिक ‘Bharat Live News Media’ने याबाबतचा आढावा घेतला.
रानडे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार या प्रकल्पासाठी अंदाजे 89 कोटी रुपये खर्च अपेक्षिला आहे. मात्र, अजून निधी मिळालेला नाही. राज्य सरकारकडे अपेक्षित निधीसाठी पाठपुरावा करत आहोत. त्याची लवकरच दखल घेऊन निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. संग्रहालयाचा विकास आणि विस्तार प्रकल्प आवश्यक आहे. जेणेकरून संग्रहालयातील जुन्या आणि दुर्मीळ वस्तू आधुनिक स्वरूपात प्रदर्शित होऊ शकतील आणि अधिकाधिक पर्यटक नूतन प्रस्तावित संग्रहालयास भेट देऊ शकतील.
संग्रहालयदिनी आज खास प्रदर्शनाचे आयोजन
संग्रहालयामध्ये दुर्मीळ आणि वैविध्यपूर्ण माऊथ ऑर्गन आणि इतर वाद्यांचे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. माऊथ ऑर्गनवादक सुनील पाटील यांच्या संग्रहातील माऊथ ऑर्गन आणि वाद्यांचा खजिना पुणेकरांना पाहता येणार आहे. हे प्रदर्शन शुक्रवार पेठेतील राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या वाद्य दालनामध्ये सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या
वेळेत आयोजिले आहे.
हेही वाचा
वरंध घाट पुन्हा एकदा बंद; 30 मेपर्यंत वाहतुकीस मज्जाव!
कोलकात्याची लिची पुण्याच्या बाजारात; हंगाम सुरू झाल्याने आवक वाढली
कोल्हापूर : ढसाढसा रडत जयकुमार शिंदे यांचा राजकीय संन्यास