मतदान टक्केवारी वाढली! यश एकट्याचे नसून सांघिक: जिल्हाधिकारी
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – निवडणुकीत मतदान वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमातून समाजातील सर्व घटक, संस्था, संघटना, प्रसारमाध्यमे आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे हे यश एकट्याचे नसून सांघिक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते समाजकल्याण भवनात आयोजित सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
स्वीप या उपक्रमात सहभागी होऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, संस्था तसेच संघटना व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा सत्कार तसेच स्विप उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये पात्र झालेल्या व्यक्ती तसेच संस्थाचा सत्कार कार्यक्रम समाजकल्याण भवन येथे शुक्रवार (दि.१७) रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, जळगाव शहर महानगर पालिकेच्या आयुक्त पल्लवी भागवत, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, सर्वांनी घेतलेल्या मेहनतीमुळे जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीप्रसंगी मतदान टक्केवारी वाढविण्यात विशेष कामगिरी करू शकलो आहोत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्नांची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. स्वीप या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधे प्रावीण्य मिळविलेल्या स्पर्धकांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त योगेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
हेही वाचा:
कोलकात्याची लिची पुण्याच्या बाजारात; हंगाम सुरू झाल्याने आवक वाढली
विकेट नाही, पूरणने षटकार ठोकले, अर्जुन तेंडुलकरला राग अनावर
सकाळी कारवाई; संध्याकाळी हातगाड्या पुन्हा त्याच जागेवर..!