सकाळी कारवाई; संध्याकाळी हातगाड्या पुन्हा त्याच जागेवर..!
कसबा पेठ : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाड्याजवळील प्रेमळ विठ्ठल मंदिर परिसरातील पथारीवाल्यांवर गुरुवारी (दि.17) कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात आली आणि दंड वसूल करून गाड्या सोडण्यात आल्या. सकाळी कारवाई करण्यात आलेल्या गाड्या संध्याकाळी पुन्हा त्याच जागेवर लावण्यात आल्या. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाला दंडवसुली हवी, अतिक्रमण निर्मूलन नको, असे म्हणायची वेळ आली आहे.
नो हॉकर्स झोन असलेल्या शिवाजी रस्ता व बाजीराव रस्त्यावर अनधिकृत पथारी व्यावसायिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाजी रस्त्यावर पथारी व्यावसायिक एकच परवाना दोन ते तीन ठिकाणी वापरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच, परवान्यावर असलेला पत्ता सोडून इतर ठिकाणी व्यवसाय करण्याच प्रकार शिवाजी रस्त्यावर सर्रास सुरू आहे. अतिक्रमण विभाग फक्त पथारी व्यावसायिकाचे साहित्य जप्त करण्यात धन्यता मानत असून, एक परवाना अनेक ठिकाणी व्यवसायाचा पत्ता सोडून व्यवसाय करणार्यांवर या पथकाकडून कारवाई केली जात नाही.
अतिक्रमण विभागातर्फे शनिवारवाड्याजवळील प्रेमळ विठ्ठल मंदिर परिसरातील व बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानासमोर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यात 5 हातगाडी, 1 लोखंडी चहा स्टॉल, 1 लाकडी ज्यूस काइंटर, 1 दालच्या विक्री काउंटर तसेच शेडवर ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई महापालिका सहायक आयुक्त अमोल पवार यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण निरीक्षक गणेश तारू, काटकर, सोनवणे, सरोदे यांनी केली. यापुढे थकबाकी व्यावसायिकांच्यावर देखील कारवाई करण्यार असल्याचे सूचित केले आहे.
दंड वसूल करून, पावत्या करून आम्ही गाड्या सोडतो. पुन्हा गाड्या आढळल्यास परत कारवाई करतो. एकाच ठिकाणी दोनवेळा कारवाई करणे शक्य होत नाही. दंडाची रक्कम वाढवावी लागेल किंवा गुन्हे दाखल करावे लागतील. पॉलिसी पद्धतीने कारवाई सुरू आहे. दररोज कारवाई शक्य नाही. बाकीच्या 10 ठिकाणच्या तक्रारी आलेल्या असतात. जप्त केलेले साहित्य ठेवायला जागा नाही. साहित्य जप्त करायचे किती? त्याला पण मर्यादा आहे.
– अमोल पवार, सहाय्यक आयुक्त,कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय
हे करण्याची गरज
अतिक्रमण विभागाचे कर्मचारी ठिकठिकाणी उभे केले पाहिजेत.
अतिक्रमण विभागाकडून नाममात्र कारवाईने पथारीवाल्यांना भीती राहिली नाही.
अतिक्रमण विभागाची गाडी कायम फिरती पाहिजे.
एका परवान्यावर अनेक ठिकाणी व्यवसाय करणार्यांकडे दुर्लक्ष.
परवान्यावरील पत्ता सोडून इतर ठिकाणी व्यवसाय करणार्यांची संख्या वाढली.