गुरूच्या लाल ठिपक्यासमोरून जाणार्‍या चंद्राची ‘जुनो’ने टिपली छबी

वॉशिंग्टन : गुरू हा आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह. त्याला चंद्रही तितकेच मोठ्या संख्येने आहेत. निव्वळ वायूचा एक विशाल गोळा असलेल्या गुरूला तब्बल 95 चंद्र आहेत. त्यापैकी युरोपा, गॅनिमीडसारखे चार चंद्र खगोलशास्त्रज्ञांच्या नजरेत असतात. आता गुरूचा पाचवा मोठा चंद्र त्याच्यावरील प्रसिद्ध ग्रेट रेड स्पॉटवरून जात असताना जुनो अंतराळयानाच्या कॅमेर्‍यात टिपण्यात आला आहे. हा लाल ठिपका …

गुरूच्या लाल ठिपक्यासमोरून जाणार्‍या चंद्राची ‘जुनो’ने टिपली छबी

वॉशिंग्टन : गुरू हा आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह. त्याला चंद्रही तितकेच मोठ्या संख्येने आहेत. निव्वळ वायूचा एक विशाल गोळा असलेल्या गुरूला तब्बल 95 चंद्र आहेत. त्यापैकी युरोपा, गॅनिमीडसारखे चार चंद्र खगोलशास्त्रज्ञांच्या नजरेत असतात. आता गुरूचा पाचवा मोठा चंद्र त्याच्यावरील प्रसिद्ध ग्रेट रेड स्पॉटवरून जात असताना जुनो अंतराळयानाच्या कॅमेर्‍यात टिपण्यात आला आहे. हा लाल ठिपका म्हणजे गुरूवरील दीर्घकाळापासून सुरू असलेले विशाल वादळ आहे.
गुरूचे युरोपा, गॅनिमीड, आयओ आणि कॅलिस्टो हे चार चंद्र अधिक प्रसिद्ध आहेत. यापैकी प्रत्येक चंद्र हा हजारो किलोमीटर रुंदीचा आहे. आता हा पाचवा सर्वात मोठा चंद्र संशोधकांच्या नजरेत आला आहे. या चंद्राचे नाव आहे ‘अमॅल्थिया’. या चंद्राचा शोध एडवर्ड इमर्सन बर्नार्ड या अमेरिकन खगोल शास्त्रज्ञाने सन 1892 मध्ये लावला होता. अमॅल्थिया हा गुरूचा पाचवा मोठा चंद्र असला तरी त्याचा आकार अनोखा आहे. हा चंद्र आश्चर्यकारकरीत्या अनियमित आकाराचा असून तो एखाद्या बटाट्यासारखा दिसतो. त्याचा सर्वात लांब अक्ष हा 250 किलोमीटरचा आहे. तसेच त्याचा सर्वात अरुंद आकार हा 128 किलोमीटरचा आहे.
‘नासा’च्या गॅलिलिओ स्पेसक्राफ्टने 2000 च्या प्रारंभी त्याचे गुरुत्वाकर्षण मोजले होते. त्यावरून असे दिसून आले की, हा चंद्र म्हणजे ठोस स्वरूपातील खडकाळ रचना नसून सैलसरपणे एकमेकांशी जोडलेला ढिगारा आहे! आता ‘जुनो’ यानाने अमॅल्थियाचे प्रथमच छायाचित्र टिपले आहे. हे यान 7 मार्चला 59 व्या वेळी गुरूजवळून गेले. त्यावेळी गुरूसमोरून जात असलेल्या या चंद्राची प्रतिमा ‘जुनो’ने टिपून घेतली.