मतदानाची अंतिम आकडेवारी देण्यात विलंब का?; SC ची EC ला नोटीस
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : मतदान पार पडल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस जारी करून उत्तर मागितले आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) संस्थेने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मतदान संपल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती जी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती संजय मिश्रा यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून एक आठवड्याच्या आत उत्तर मागितले आहे.
निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे, असे सांगून न्यायमूर्तींनी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजे, २४ मे रोजी याप्रकरणी सुनावणी ठेवली आहे.
मतदानानंतर काही दिवसांनी टक्केवारीत वाढ?
मतदानानंतर काही दिवसांनी अंतिम मतदानाच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बदलण्याची चिंता व्यक्त करत, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या स्वयंसेवी संस्थेने याचिका दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले.
मतदानाची आकडेवारी देण्यात काय अडचण?
दरम्यान, खंडपीठाने “वेबसाइटवर मतदानाची आकडेवारी देण्यात काय अडचण आहे?” अशी विचारणा केली असता निवडणूक आयोगाच्या वकिलांनी सांगितले की “आम्हाला मोठा डेटा गोळा करायचा असल्याने विलंब झाला”.
याआधी २६ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने ने ADR ची मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी आणि EVM बद्दलची शंका फेटाळून लावली होती.
हे ही वाचा :
सोरेन यांना दिलासा नाहीच; जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली
खटला विशेष न्यायालयात असेल, तर ‘ईडी’ला अटकेचे अधिकार नाहीत