सांगलीत तीन कॅफेंची तोडफोड; 16 जणांना अटक
सांगली; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील शंभरफुटी रस्ता आणि विश्रामबाग येथील तीन कॅफेंची श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्यावतीने तोडफोड करण्यात आली. हँग ऑन या कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्याच्या निषेधार्थ ही तोडफोड करण्यात आली.
याप्रकरणी कॅफेचालक आशुतोष प्रताप घाडगे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या 16 कार्यकर्त्यांना अटक केली. यामध्ये रणजित चंदन चव्हाण, रोहित रामचंद्र मोरे, करण महालिंग म्हेत्रे, विक्रांत विठ्ठल कोळी, विनायक बसाप्पा आवटी, शंकर नागराज वडर, संदीप अशोक जाधव, अर्जुन ईश्वर गेजगे, अविनाश पोपट भोसले, प्रथमेश अशोक सूर्यवंशी, सागर अनिल सूर्यवंशी, योगेश बाळू गुरका, मारुती गोविंद गुटुगडे, विलास गोपाळ पवार, प्रदीप अधिकराव पाटील
आणि दिगंबर मनोहर साळुंखे (सर्व रा. सांगली) यांचा समावेश आहे.
शंभरफुटी रस्त्यावरील हँग ऑन या कॅफेमध्ये एका अल्पवयीन मुलीला तासगावमधील तरुणाने कॉफी पिण्यासाठी नेले होते. त्यावेळी दोघांमध्ये गप्पा रंगल्या. अल्पवयीन मुलीला बोलण्यात गुंतवून संबंधित तरुणाने तिच्या कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळले. त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसात दिली होती. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी आशिष चव्हाण या तरुणाला अटक केली होती.
कॅफेत मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेचे सांगलीत तीव्र पडसाद उमटले. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानने हँग ऑन या कॅफेमध्ये घुसून तोडफोड केली. त्यानंतर विश्रामबाग परिसरात असणार्या कॅफे सन शाईन आणि बेनिको या अन्य दोन कॅफेंची देखील तोडफोड केली. कॅफेमधील साहित्य, कुलर, खुर्च्या, टेबल आदी साहित्याची तोडफोड केल्याने मोठे नुकसान झाले. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानने तोडफोड केल्यानंतर कॅफेमधील अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. या कॅफेमध्ये तरुण-तरुणींना कॉफी पिण्यासाठी सोय करण्यात आली होती. तसेच त्यांना एकांत मिळावा यासाठी पडदे लावलेली छोटी-छोटी कम्पार्टमेंट तसेच बेडची सोयही करण्यात आली होती. या ठिकाणी तरुण-तरुणी ‘विश्रांती’साठी येत असल्याचे उघडकीस आले. या सर्व कॅफेंची श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून तोडफोड करण्यात आली आहे.
तोडफोड सुरू होताच जोडप्यांची पळापळ
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानने तीन ठिकाणी धाड टाकून तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही कॅफेमध्ये जोडपी आली होती. अचानक हल्ला झाल्याने या जोडप्यांची तारांबळ उडाली. त्यानंतर या जोडप्यांनी कॅफेतून पळ काढला.
‘विश्रांती’साठी खोलीची खास सोय
विश्रामबाग येथे फोडण्यात आलेल्या कॅफेमध्ये पोटमाळा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी कोणाला शंका येऊ नये, या पद्धतीने जिना बनविण्यात आला आहे. तसेच कोणाचा छापा पडलाच, तर जोडपे सापडू नये म्हणून जिन्यावर फोल्डेबल दरवाजे बसविण्यात आले आहेत.
बलात्काराच्या घटनेनंतर कॅफेचा भांडाफोड
सांगलीतील कॅफेत गोरखधंदा सुरू असून तो बंद करावा, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे नितीन चौगुले यांनी पोलिसांकडे केली होती. परंतू गेल्या वर्षभरापासून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाले होते. बलात्काराच्या घटनेनंतर आता कॅफेतील गोरखधंद्याचा भांडाफोड झाला आहे.
…अन्यथा उत्तर प्रदेश पॅटर्न राबविणार
सांगलीतील अन्य कॅफेत देखील असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे तातडीने संबंधित कॅफे बंद करावेत अन्यथा उत्तर प्रदेश येथील योगी आदित्यनाथ यांचा पॅटर्न सांगलीत राबवून बुल्डोझरच्या साहाय्याने कॅफे उद्ध्वस्त करण्याचा इशारा चौगुले यांनी दिला.