छत्तीसगडमधील तरुणीवर कोल्हापुरात अत्याचार
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : नोकरीचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील तरुणीला फूस लावून कोल्हापुरात आणून अत्याचार केल्याचे शुक्रवारी उघड झाले. संबंधित तरुणीने शिरोलीतील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी संबंधित तरुणीला घेऊन कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांचे कार्यालय गाठले. तरुणीच्या तक्रारीवरून माजीद खान या तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली. दरम्यान, लव्ह जिहादचा संशय व्यक्त करत हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक बनले होते.
छत्तीसगड राज्यातील डमरटौली गावात राहणार्या गरीब कुटुंबातील एका तरुणीला तिथे कामानिमित्त गेलेल्या रुस्तम खान या तरुणाने नोकरीचे आमिष दाखविले. त्यासाठी तिला महाराष्ट्रात पाठवण्यास तिच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर संबंधित तरुणीला 11 मे रोजी शिरोली एमआयडीसी इथल्या माजीद खान या भावाकडे पाठवले. त्याने तिला नोकरी लावतो, असे सांगून आपल्या खोलीत डांबून ठेवले. तिच्यावर अत्याचार केला. याबाबत तरुणीने शेजारील कुटुंबीयांना माहिती दिली. त्या कुटुंबाने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती दिली.
शुक्रवारी सकाळी कार्यकर्ते संबंधित कुटुंबीयांच्या घरी गेले. दिवसभर त्यांनी पीडित तरुणीकडून माहिती घेतली. त्यानंतर तिला जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयात आणले. येथे त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना घटना सांगितली. कळमकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधून संबंधित तरुणीची तक्रार घेतली. त्यानंतर माजीद खान याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले. पीडित तरुणीला छत्तीसगडला पाठवण्याची व्यवस्था करणार असल्याचे कळमकर यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेचे बंडा साळोखे यांच्यासह प्रशांत कागले, नीलेश शिंदे, श्रीकांत कदम, श्रीपाद रंगापुरे, प्रमोद कारंडे, राहुल मोरे, हर्षद देशपांडे, दीप कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.