काँग्रेसने जनतेची नव्हे, चेल्या चपाट्यांची गरिबी हटवली : नितीन गडकरी
धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूनपासून इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी भारतात गरिबी हटावचा नारा दिला. या अंतर्गत वीस कलमी ,पाच कलमी कार्यक्रम येऊन बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. मात्र जनतेची गरीबी हटली नाही. पण काँग्रेसच्या माध्यमातून अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय तसेच शाळा मिळाल्याने काँग्रेसच्या चेल्या चपाट्यांची गरिबी हटली. विशेष म्हणजे शिक्षकांच्या वेतनामध्ये अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही ,यातून गावात रोजगार हमी अशी परिस्थिती काँग्रेसच्या सत्त्ता काळात होती, अशी टीका आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
काय म्हणाले गडकरी ?
भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलणार हा कॉंग्रेसचा बिनबुडाचा आरोप. देशातील संविधान कोणीही बदलू शकत नाही.
इंदिरा गांधी यांनी 80 वेळेस बदल करून घटनेची तोडमोड करण्याचे पाप केले आहे.
काँग्रेसने जनतेची नव्हे तर चेल्या चपाट्यांची गरिबी हटवली.
याउलट गरीबी हटावसाठी मोंदीनी दहा वर्षात अनेक योजना हाती घेत हे काम करुन दाखवलं.
धुळे लोकसभा मतदारसंघातील शिंदखेडा येथे आज (दि. 17) महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, लोकसभेचे समन्वयक तथा राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्यासह आमदार जयकुमार रावल, आमदार मंगेश चव्हाण, आमदार काशीराम पावरा, डॉक्टर राजेंद्र फडके, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धरती देवरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा परिषदेच्या सदस्य संजीवनी सिसोदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
दोन राज्यांमधील पाण्याचा वाद संपवला
या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्रपणे जल शक्ती विभाग तयार केला. प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी मिळावे तसेच पुरापासून नुकसान थांबावे यासाठी गंगा कावेरी योजनेप्रमाणे योजना राबवल्या गेल्या. गोदावरी नदीपात्रातील तेराशे टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. त्यामुळे गोदावरीचे पाणी कृष्णा नदीत, कृष्णा नदीचे पाणी पेडगर नदीत आणि पेडगर नदीचे पाणी कावेरी नदीमध्ये टाकून तामिळनाडू आणि कर्नाटक पर्यंत हे पाणी नेले. यातून या दोन राज्यांमधला पाण्याचा वाद देखील संपवण्याचे काम सरकारने केले आहे. या देशात 1970 पासून राज्या राज्यात नदीच्या पाण्यावरून वाद होते. पण आपण या विभागाचे मंत्री झाल्यानंतर 23 पैकी 17 भांडणे संपवले. या अंतर्गत संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका खोलीत बसवून चर्चा केली. त्यामुळेच हे यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या विषयाला प्राथमिकता दिली गेली. येणाऱ्या काळात देखील या विषयाला अशाच पद्धतीने प्राथमिकता दिली जाणार आहे.
अर्धा तुम्ही, अर्धा आम्ही आणि गावात रोजगार हमी
खाणींमध्ये असलेले पाणी सोलर पंपांच्या माध्यमातून लिफ्ट करून त्यातून वीज आणि सिंचनाच्या कामांना वापर केला गेला. अशाच प्रकारच्या योजना हिमाचल प्रदेशात देखील केल्या गेल्या. शेतकरी कल्याणसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी अशा योजना करू शकते. देशात काँग्रेसच्या माध्यमातून पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी गरीबी हटावचा नारा दिला. पण गरिबांची गरिबी हटली नाही. काँग्रेसने त्यांच्या चेलाचपाट्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय, प्राथमिक शाळा वाटल्या. या शाळांमधून शिक्षकांच्या पगारामधून देखील डल्ला मारण्यात आला. त्यामुळे शिक्षकांच्या पगारात अर्धा तुम्ही, अर्धा आम्ही आणि गावात रोजगार हमी ,अशा पद्धतीने काँग्रेसच्या चेला चपाट्यांची गरिबी हटली. काँग्रेसने त्यांच्या साठ वर्षाच्या सत्ता काळात एक पाव डटाव, आणि गरीबी हटाव, या उक्तीप्रमाणे काम केले. गरिबी हटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवलं
गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी हटाव साठी अनेक योजना राबवून हे काम करून दाखवले आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण देखील दहा हजार कोटी पेक्षा जास्तीची रस्त्यांची कामे केली. मात्र कामात ठेकेदारांना भडवेगिरी करू दिली नाही. 50 लाख कोटींची कामे केली. पण ठेकेदारांना तंबी देऊन दर्जेदार कामांचा आग्रह धरला. या देशातील शेतकरी अन्नदाता आहे. पण भारतीय जनता पार्टीने त्यांना ऊर्जादाता बनवण्यासाठी काम केले आहे. आता उसाच्या मळीपासून इथेनॉल तयार करण्याचे प्रकल्प उभे राहत आहे. या माध्यमातून 300 पेट्रोल पंप उभे राहणार असून याचा सरासरी विचार केल्यास 25 रुपये लिटर पेट्रोल याप्रमाणे सर्वांनाच त्याचा फायदा होईल. चार चाकी गाड्या इथेनॉल वर चालतील. तर शेतात ड्रोन च्या माध्यमातून फवारणी होणार आहे. युरिया सुफला फवारण्याची गरज पडणार नाही. हाताने ही खते फवारल्यामुळे केवळ 25 टक्के पिकांना त्याचा फायदा होतो 75 टक्के खत वाया जाते. मात्र नॅनो खत ड्रोन च्या माध्यमातून वापरले असता केवळ 25 टक्के वाया जाऊन 75 टक्के त्याचा फायदा होतो. एक बॉटल आणि एक बॅग या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन ते तीन हजार रुपयांची बचत होते. आमच्या सरकारने या देशातील 15000 महिला बचत गटांना ड्रोन दिले असून आता प्रत्येक गावात ड्रोन दिले जाणार आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कल्याण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे सरकार करीत आहे. पण काँग्रेस गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यास ते संविधान बदलणार आहे. अशी बिन बुडाची टीका केली जाते आहे. मात्र या देशातील संविधान कोणीही बदलू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केशवानंद भारती या खटल्यात निर्णय देऊन घटलेचे मूलभूत तत्व कोणीही बदलू शकत नाही, हे स्पष्ट केले आहे. मात्र घटनेचा ब भाग बदलण्याचा अधिकार आहे. इंदिरा गांधी यांनी 80 वेळेस बदल करून घटनेची तोडमोड करण्याचे पाप केले आहे. आपल्या स्वार्थासाठी अशा पद्धतीने बदल करणारी काँग्रेस आता संविधान बदलण्याचा आरोप करीत आहेत, असा टोला देखील त्यांनी लावला.
हेही वाचा –
Hemant Soren: झारखंड जमीन घोटाळा प्रकरण: हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, जामीनावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली
श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दर्शनासाठी भाविकांची गर्दी