अतिविचार आजारास कारणीभूत
डॉ. संतोष काळे
आयुष्यात प्रत्येकाला अनेक प्रकारच्या समस्यांना, अडचणींना तोंड द्यावे लागते. त्या कशा निस्तरायच्या याचा विचारही व्यक्ती करतो. विचार करून काम करणे आणि उपाय शोधणे, ही चांगली गोष्ट आहे. पण दरवेळी अतिविचार करणे हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते.
नोकरदार-व्यावसायिकांना ऑफिसमध्ये गेल्यावर प्रत्येकालाच काही समस्या भेडसावतात; पण रोजीरोटीसाठी काम करणे अपरिहार्य असल्याने अनेकांचा नाइलाज असतो. यातील बहुतेक जण ऑफिसमधील तणाव घरी आणतात. पण त्यामुळे वैयक्तिक आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. प्रत्येक वेळी त्याच गोष्टींविषयी बोलणे, विचार करणे सुरू राहते. त्यातून फायदा काहीच होत नाही; पण विचारचक्र सातत्याने सुरू राहते. या विचारचक्रातून समस्येचा उपाय मिळण्याऐवजी उलट कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. अतिविचार करण्याने नव्या समस्या तयार होतात. कित्येकदा व्यक्ती नैराश्यग्रस्त होतात. नैराश्याची पातळी वाढल्यास व्यक्ती आत्महत्येसारखे पाऊलही उचलू शकते. आपल्याला अतिविचाराचीही सवय लागू नये, यासाठी ऑफिसमधील कटकटी ऑफिसातच सोडून याव्यात किंवा त्यावर उपाय शोधावा. त्याची चर्चा घरी येऊन किंवा खासगी आयुष्यात करू नये.
अतिविचाराने सर्वात मोठे नुकसान होते ते मेंदूचे. कारण मेंदूच्या क्षमतेवर त्याचा अधिक प्रभाव पडतो. मेंदू योग्य प्रकारे काम करू शकत नाही. अतिविचारामुळे मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही. त्यामुळे निर्णय अक्षमता, स्मरणशक्ती कमजोर होणेे, मेंदूचे आजार होण्याचा धोका वाढणे, कार्यक्षमता कमी होणे, झोप न येणे, बेचैनी, चिडचिड, राग येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.
अतिविचार करणे हे एखाद्या व्यसनासारखेच आहे. काही काळानंतर विचार मनावर राज्य करू लागतात. अशा व्यक्ती अतिकल्पनाविस्तार करत राहतात. त्यामुळेच मेंदू जास्त भटकू देऊ नका. जास्त विचार केल्यास आपल्या शरीरात कॉर्टिसोल हार्मोन्सची वाढ होते. त्यामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या मते, अतिविचार किंवा मेंदू शिणणे यामुळे तणाव, चिंता आणि मूड स्विंग यांसारख्या मानसिक समस्या उद्भवतात. त्याचा परिणाम आपल्या पचन संस्थेवरही होऊ शकतो. त्यामुळे पोटात जळजळ होणे, इरिटेबल बोवेल सिन्ड्रोम, गॅस्ट्रिक सिक्रेशनमध्ये बदल, आतड्यांचे कार्य योग्य प्रकारे न होणे आदी समस्या निर्माण होतात. जास्त विचार किंवा चिंता करणे हे हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम करते. अनेक प्रकारच्या आजारपणांचा धोका वाढवते.
अतिविचारामुळे छातीमध्ये वेदना, चक्कर येणे अशा काही समस्या निर्माण होतात. नैराश्य, व्यसन आणि झोपेशी निगडित समस्या या सतत विचार करण्याच्या सवयीचा परिपाक आहेत. अतिविचार केल्याने चिंता वाढते. चिंतेमुळे भावनात्मक तणावही वाढतो. तसेच सोरायसिस, एटॉपिक डर्मेटायटिस, खूप जास्त खाज येणे, एलोपेशिया एरियाटा आणि सिबोरहिक डर्मेटायटिससारख्या समस्या वाढण्याची शक्यता असते.
अतिविचार किंवा सततच्या चिंतेमुळे रोगप्रतिकारक शक्तीही प्रभावित होते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे मेंदूच्या पेशी कमजोर होतात. यापासून बचाव करायचा असेल, तर नियमित व्यायाम हा व्यग्र दिनचर्येतही समाविष्ट झाला पाहिजे. रोज चालणे, धावणे किंवा योगाभ्यास, पोहणे आदी प्रकारचे व्यायाम केल्याने मेंदू आणि शरीर संतुलित राहते. व्यायाम केल्याने शरीरात तणाव निर्माण करणार्या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते आणि आनंद देणार्या हार्मोन्सचे प्रमाण अधिक वाढते. अतिविचाराच्या समस्येवर अक्सीर इलाज म्हणजे मेडिटेशन अर्थात ध्यानधारणा. रोजच्या 24 तासांपैकी 15 ते 30 मिनिटे एका जागी शांत बसून, डोळे मिटून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. मनात येणार्या विचारांना रोखू नका. रोज असे केल्यामुळे अतिविचारांच्या समस्येतून मुक्तता मिळू शकते.