तुम्ही डिजिटल जाळ्यात अडकत तर नाही ना?

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त 17 मे हा जागतिक दूरसंचार दिन म्हणून 1969 पासून साजरा केला जातो. दैनंदिन जीवन आणि आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी संप्रेषण तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस आहे. मात्र अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटस्, स्मार्टफोन, सॅटेलाईट इंटरनेटकडे झेपावत असताना, तंत्रज्ञान विषमतेच्या धोक्यांसह वैयक्तिक सतर्कता गरजेची आहे. अन्यथा एका झटक्यात पायाखालची वाळू घसरते, तसे …

तुम्ही डिजिटल जाळ्यात अडकत तर नाही ना?

प्रा. किरणकुमार जोहरे, तंत्रज्ञान अभ्यासक

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त 17 मे हा जागतिक दूरसंचार दिन म्हणून 1969 पासून साजरा केला जातो. दैनंदिन जीवन आणि आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी संप्रेषण तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस आहे. मात्र अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटस्, स्मार्टफोन, सॅटेलाईट इंटरनेटकडे झेपावत असताना, तंत्रज्ञान विषमतेच्या धोक्यांसह वैयक्तिक सतर्कता गरजेची आहे. अन्यथा एका झटक्यात पायाखालची वाळू घसरते, तसे डिजिटल अपघात आपल्या जीवनाची दिशा भरकटून टाकू शकतो.
कट्ट्यावर, घरात गप्पा मारतात अथवा थेट मोबाईलवर बोललात आणि थोड्या वेळातच तुम्हाला मोबाईलवर त्याच संदर्भातील जाहिराती, व्हिडीओ, चक्क विविध कंपन्यांचे फोन येऊन एखादे उत्पादन अथवा एखाद्या सेवेची तुम्हाला गरज आहे का? अशी विचारणा झाल्याचा अनुभव तुम्हाला आला आहे का? जर उत्तर ‘हो’ असेल, तर वास्तव समजून घ्या की, तुमचा प्रत्येक बोललेला शब्द टॅप होतोय, ऐकला जातोय हे लक्षात घ्या. डेटा इज किंग! हा सध्याच्या डिजिटल युगात अल्लाउद्दीनचा चिरागच! व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (व्हीआर), अ‍ॅग्यु्रमेंटेड रिअ‍ॅलिटी (एआर), मिक्स्ड रिअ‍ॅलिटी (एमआर), संवादासाठी वस्तू, प्रणाली किंवा प्रक्रियेची हुबेहूब आभासी प्रतिकृती बनवणारी डिजिटल ट्विन्स टेक्नॉलॉजी, क्वांटम एनटॅगलमेंट, क्वांटम ट्रान्स्पोर्टेशन या माध्यमातून संवादाचा चेहरामोहराच बदलला आहे. केवळ माहिती नव्हे, तर अख्खा जिवंत माणूस डाऊनलोड करण्यासाठी संशोधन सुरू आहे.
मोबाईल व इंटरनेट अ‍ॅप व इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटस् तुमची माहिती गोळा करीत आहे. तुमचा काही सेकंदांचा आवाज रेकॉर्ड करीत, सोशल मीडियावरील फोटोवरून तुमच्या बोटांचे ठसे मिळवणारे डिजिटल तंत्रज्ञान पाहून, टेक्नॉलॉजी वरदान मानावी की शाप? असा प्रश्न जीवनाचा पेपर सोडविताना पडला नसेल, तर अजूनतरी तुम्ही नशीबवान आहात. एवढेच नाही, तर तुम्ही काय निर्णय घेणार, कोणती कृती करणार, न बोललेल्या गोष्टींमागे ही तुमचे हेतू काय? याचा वेध घेत तुम्हाला अगदी काही क्षणात अटक होण्याची कार्यवाहीही नाकारता येत नाही कारण तुमच्या प्रत्येक कृतीवर नजर आहे, तुमचे प्रत्येक बोलणे ऐकले जातेय. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) बेस्ड कॉम्प्युटर अल्गोरिदमवर काम करणारे घड्याळ, मोबाईल आदी इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट तुमच्या शरीराला चिटकले आहे. काही काळातच तुमच्या शरीरातच इलेक्ट्रॉनिक्स नॅनो सेन्सर रोबोटस् तुमच्या आरोग्याची काळजी या नावाने रक्तातून शरीरात धावतील आणि तुमचे उरलेसुरलेले खासगी जीवनही संपुष्टात येईल. सामान्यच काय, पण मोठमोठ्या नेते व गुन्हेगारांनाही याची कल्पना नाही. हे आजचे जिवंत सत्य आहे.
इंटरपोल, इंटेलिजन्स ब्यूरो, पोलिसांकडून इतकेच काय; तर तुम्ही ज्या सरकारी किंवा खासगी संस्थेत काम करतात तेथेही तुमच्यावर कदाचित पाळत ठेवली जात आहे. तुम्ही ट्रेड सिक्रेट लीक करीत नाही ना? किंवा प्रतिस्पर्धी कंपनीसाठी हेरगिरी करीत एखादी गोपनीय माहिती पुरवून संस्थेला आर्थिक वा अन्य अडचणीत आणत नाही ना? आदी अनेक कारणांमुळे नकळत तुमचा फोन टॅपिंग सुरू असेल, याची भणकही अनेकांना नाही. तेव्हा तुम्हाला जपूनचे बोलावे लागेल. विविध मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करत असताना मोबाईलमधील फोटो, फोन नंबर, कॅमेरा, यांच्या परवानग्या देत आयुष्याच्या तिजोरीचे दरवाजेच तुम्ही सतत उघडून देत असाल, तर हॅकर आणि क्रॅकर तुमचे बँक अकाऊंट रिकामे करीत, गोपनीय माहिती थेट डार्क वेबच्या दुनियेत सर्व पासवर्डसह खिरापतीसारखी वाटत तर नाही ना? याची खात्री करून घ्यायला हवी.
फोन टॅपिंगमुळे एखाद्या राज्यात राजकीय भूकंप होत सरकारही बदलू शकते. हसत्या-खेळत्या कुटुंबांत डिपफेक व्हिडीओमुळे आरसा तडकावा तसा विश्वासाला तडा जात आहे आणि कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. सायबर क्राईममुळे तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत. तुमची खासगी संभाषणे, माहिती उघडकीस आणण्याची धमकी, ब्लॅकमेलिंग, मनी एक्स्टॉर्शनमुळे चिंतेत भर पडत आहे. इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपने विकसित केलेले पेगासस हे सॉफ्टवेअर म्हणजे तहलका म्हणावा लागेल. हे तंत्रज्ञान स्मार्टफोनमध्ये घुसखोरी करू शकते आणि संदेश, ई-मेलमध्ये तुमच्या नकळत प्रवेश करीत संपूर्ण मोबाईलचा ताबा घेऊ शकते. वापरकर्त्याच्या माहितीशिवाय मायक्रोफोन आणि कॅमेराही सक्रिय करू शकते.
दहशतवाद आणि गंभीर गुन्ह्यांच्या विरोधात वापरण्यासाठी बनविले गेलेले पेगासस सॉफ्टवेअरचा वापर जगातील विविध देशांप्रमाणे भारतातही वादग्रस्त ठरला. याचा वापर पत्रकार, कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तींची हेरगिरी करण्यासाठी केला गेला. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन ऑफर करणारे सॉफ्टवेअरने मेसेज आणि कॉल्स इंटरसेप्ट करणे अधिक कठीण होते. सुरक्षित अवघड पासवर्ड वापरणे, अनधिकृत अ‍ॅप डाऊनलोड न करणे, लिंक क्लिक न करणे, ब्लॉकचेन आणि क्रिप्टोग्रॉफीमुळे बर्‍याच अंशी सुरक्षितता व गोपनीयता राखली जाऊ शकते.मात्र ज्या देशात टेक्नॉलॉजी कौशल्य असलेले मनुष्यबळ तुटपुंजे आहे व सायबर गुन्हेगारी रोखणारी फॉरेन्सिक लॅब यंत्रणाही एका सॅपलचा अहवाल देण्यास किमान तीन ते दहा वर्षे इतका वेळ घेत असेल, तर अशा देशाचे भविष्य कसे असेल? याचा विचार करण्याची गरज आहे.
उपायांची सप्तपदी!
‘टेक्नॉलॉजी वॉरियर्स’ची मदत घेत आपला फोन कुणी फॉरवर्ड करून ऐकत नाही ना, आदींची खातरजमा करावी.
फोनवर बोलताना डेटा ऑफ करून ठेवावा.
फोनवर मोजकेच व नेमके तेवढेच बोलावे.
घरात गरज नसेल तर मोबाईल डेटा सतत ऑफ करून ठेव. शक्य असल्यास फ्लाईट मोडवर फोन ठेवावा.
अनावश्यक, लक्ष विचलित करणारे सर्व नोटिफिकेशन ऑफ करून टाकावे.
आठवड्यात मोबाईलची कमीत कमी वापर करावा.
मोबाईल अ‍ॅप अपडेटेड ठेवण्यासह ते डाऊनलोड करताना आपण कोणत्या परवानग्या देत आहोत याचे भान ठेवायला हवे.