बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत, अजंग ग्रामस्थांचा नामपूर मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको
मालेगाव : नीलेश शिंपी
तालुक्यातील अजंग येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन आठ वर्षीय मुलीचा गावातीलच मोसम नदीकाठी असलेल्या एका विहिरीत बुधवारी (दि.15) मृतदेह आढळून आल्याने गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह तरंगत असलेल्या विहिर परिसरात गर्दी केली होती. अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त करीत आरोपीला 24 तासाच्या आत अटक करण्याची मागणी करीत नामपूर मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको केला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी संशयीताना अटक करण्याचे आश्वसन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
तालुक्यातील चंदनपुरी येथील भविका उर्फ रिया ज्ञानेश्वर महाले (वय 8) ही अजंग येथील प्रशांत नगरमध्ये राहणारी तिची आजी निर्मला शेलार यांच्याकडे शिक्षणासाठी वास्तव्यास होती. सोमवारी (दि.13) रोजी रात्री साठेआठ वाजेच्या दरम्यान भाविकाची आजी भाविकाला झोपवून गल्लीतच होत असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती. मध्यरात्री दीड वाजेच्या सूमारास निर्मलाबाई घरी परत आल्या असता त्यांना भाविका घरी नसल्याचे दिसले. त्यामुळे त्यांच्यासह ग्रामस्थांनी आजूबाजूला शोधाशोध केली. भाविका न सापडल्याने नातेवाईकांनी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. भाविकाचा शोध सुरू असतानाच बुधवारी गावातीलच विनोद शिरोळे यांच्या मोसम नदीकिनारी असलेल्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. भाविकाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत संतप्त ग्रामस्थांनी मालेगाव नामपूर रस्त्यावर रास्ता रोको केला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्यासह पोलीस अधिकार्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी संशयीत आरोपीला 24 तासाच्या आत अटक करण्याची मागणी लावून धरली. यावेळी संधू यांनी पोलीस योग्यरितीने तपास करीत असून संशयीतांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. भाविकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मालेगाव शहरातील सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे.