नाशिकच्या एक-एक रेल्वे पळविल्या, नाशिककर संतापले
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिककर आणि गोदावरी एक्स्प्रेस असा तीस वर्षांचा प्रवास गत आठवड्यात संपुष्टात आला. त्या सोबत नाशिककरांच्या हक्काची आणखीन एक गाडी पळवून नेण्याचे पाप रेल्वे मंत्रालयाने आपल्या माथी घेतले आहे. मनमाड येथून सुटणारी गोदावरी कायमची बंद झाल्याने गाडीसोबतचा जिव्हाळ्याला मुकावे लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
मध्य रेल्वेवर भुसावळ विभागात सर्वाधिक महसूल देणाऱ्या नाशिकवर रेल्वे मंत्रालयाकडून नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते. मग ते जिल्ह्यातील स्थानकांच्या दयनीय अवस्था असो की, रेल्वेगाड्या पळविण्याचा घाट असो. रेल्वे मंत्रालयाने नाशिकला नेहमीच ठेंगा दाखविला आहे. मनमाड-मुंबई अशी नाशिककरांची सोयीची तपोवन थेट नांदेडपर्यंत नेण्याचे पाप मंत्रालयाने केले. त्यानंतर दीड ते दोन वर्षांपूर्वी नाशिककरांची हक्काची राज्यराणी मराठवाड्यात पळविली. एवढेच काय तर गेल्या महिन्यात भुसावळ-पुणे रेल्वे थेट अमरावतीपर्यंत नेली. ही गाडी विदर्भात पळविताना तिचा रुट अमरावती-मनमाड-दाैंड-पुणे असा नव्याने आखला. दरम्यान, २००६-०७ ला सर्वप्रथम मनमाड-पुणे (व्हाया कल्याण-पनवेल) अशी असलेली ही रेल्वे थेट भुसावळपर्यंत नेली. खानदेशातून ही गाडी भरून येत असल्याने पहाटेच्या वेळी मुंबई किंवा पुण्यासाठी प्रवास करणाऱ्या नाशिककरांची गैरसोय झाली.
आधी पत्नी आणि मुलाचा जीव घेतला, नंतर स्वत:लाही संपवलं; बार्शीतील धक्कादायक घटना
नाशिककरांच्या हक्काच्या गाड्या पळविणाऱ्या रेल्वे मंत्रालयाने तपोवन, राज्यराणीनंतर भुसावळ-पुणे आता थेट नाशिककरांची लाइफलाइन असलेली गोदावरीच धुळ्यापर्यंत नेली. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस अशा तिन्ही ऋतूंमध्ये नाशिककर प्रवाशांना साथ देणाऱ्या गोदावरीची माया कायमची आटली आहे. वास्तविक जिल्ह्यातील नोकरदार, विद्यार्थी तसेच सामान्य प्रवाशांचे गोदावरीशी अतूट नाते निर्माण झाले. दरवर्षी गोदावरीमध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हमखास साजरा केला जायचा. या उत्सवांसोबत अन्य सणही थाटात साजरे केले जात असल्याने नोकरदारांसाठी फिरत्या चाकांवरील हे दुसरे घरच होते. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणाऱ्या या प्रवाशांना आता या आनंदाला मुकावे लागणार आहे.
कोरोनानंतर नाशिककरांच्या मोठ्या संघर्षानंतर गोदावरी यार्डातून बाहेर पडली. परंतु, तेथेही रेल्वे मंत्रालयाने खेळी करत आठवड्यातून तीन दिवस ती धुळ्यापर्यंत नेली. आता आठवड्याचे सातही दिवस ही गाडी धुळ्यातून सुटणार आहे. नाशिककरांवर यानिमित्ताने आणखीन एक अन्याय रेल्वे मंत्रालयाने केला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र रोष आहे.
लोकप्रतिनिधींचे लोटांगण
नाशिकमधून एक-एक रेल्वेगाड्या टप्प्याटप्प्याने पळविल्या जात असताना जिल्ह्यातील खासदार व आमदार तसेच लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. दिंडोरी खासदार डॉ. भारती पवार या केंद्रात जिल्ह्याचे नेतृत्व करतात. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचीही दिल्लीत चांगली प्रतिमा आहे. मात्र, तरीही नाशिककरांच्या हक्काच्या रेल्वेगाड्या पळविल्या जात असताना या दोन्ही खासदारांकडून साधी प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे दिल्लीपुढे लोकप्रतिनिधींनी सपशेल लोटांगण घातल्याची चर्चा जिल्हावासीयांमध्ये आहे. येत्या निवडणुकीत याचा जाब विचारल्याशिवाय प्रवासी गप्प बसणार नाहीत.
‘पंचवटी’ पळविण्याचा घाट
गोदावरीनंतर नाशिककरांची लाइफलाइन पंचवटी एक्स्प्रेसही जालन्यापर्यंत पळविण्याचा घाट घातला जात आहे. त्यावरून दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने आंदोलनही केले. ‘पंचवटी’ पळविण्याची तयारी कोरोनानंतर सुरू झाली. गाडी मनमाडला रात्री गाडी पोहोचल्यानंतर तिचा रेक दुसरीकडे शेअर केला जातो. त्यामुळे पहाटेच्या वेळी मनमाडवरून मुंबईकडे गाडी नेताना एक्स्प्रेसमध्ये अनेक समस्या असतात.
हेही वाचा :
Pune Crime News : महाळुंगे हत्येतील हल्लेखोरांची नावे निष्पन्न
Pune Crime News : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक
Kolhapur Rain : अवकाळी पावसाची धामणी खोऱ्यास भीती
The post नाशिकच्या एक-एक रेल्वे पळविल्या, नाशिककर संतापले appeared first on पुढारी.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिककर आणि गोदावरी एक्स्प्रेस असा तीस वर्षांचा प्रवास गत आठवड्यात संपुष्टात आला. त्या सोबत नाशिककरांच्या हक्काची आणखीन एक गाडी पळवून नेण्याचे पाप रेल्वे मंत्रालयाने आपल्या माथी घेतले आहे. मनमाड येथून सुटणारी गोदावरी कायमची बंद झाल्याने गाडीसोबतचा जिव्हाळ्याला मुकावे लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. मध्य रेल्वेवर भुसावळ विभागात …
The post नाशिकच्या एक-एक रेल्वे पळविल्या, नाशिककर संतापले appeared first on पुढारी.