होर्डिंग्जचे फेरसर्वेक्षण! नाशिकमध्ये स्ट्रक्चरल आॉडीटच्या सूचना
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग्ज कोसळून झालेल्या जीवित व वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांनी राज्यभरातील महापालिकांना पत्र पाठवत आपापल्या क्षेत्रातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल आॉडीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेने गतवर्षीच शहरातील सर्व होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल आॉडीटची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, दक्षतेचा भाग म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे फेरसर्वेक्षण (survey of hoardings) करण्याचे आदेश कर व जाहिरात परवाना विभागाचे उपायुक्त विवेक भदाणे यांनी दिले आहेत. कर्तव्यात कसूर केल्यास संबंधित विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.
घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपावर सोमवारी (दि.१३) अवैध होर्डिंग्ज कोसळून १५ जणांचा बळी गेला आहे. या दुर्घटनेनंतर राज्यभरातील अवैध होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक लहू माळी यांनी नाशिकसह राज्यभरातील महापालिकांना तातडीने पत्र पाठवत मान्सूनपूर्व व अन्य कालावधीतही होणाऱ्या दुर्घटनांमुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी शहरी भागातील व महामार्गावरील होर्डिंग्जची संरचनात्मक तपासणी अर्थात स्ट्रक्चरल आॉडीट करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीअंती आढळून आलेले अवैध होर्डिंग्ज निष्कासित करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. दक्षतेचा भाग म्हणून नैसर्गिक आपत्तीसमयी होर्डिंग्जच्या आजुबाजुला न थांबण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश आहेत. यानंतर कर व जाहीरात परवाने विभागाचे उपायुक्त भदाणे यांनी सहाही विभागीय अधिकारी तसेच जाहिरात व परवाने विभागासाठी पत्र जारी करत २१ एप्रिल २०२३ रोजी आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत. या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे कामकाजाच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या असून त्यानुसार संबंधितांनी कारवाई न केल्यास व त्यामुळे काही अपघात झाल्यास सदर जबाबदारी संबंधित विभागाचे कर्मचारी, नोडल अधिकारी तथा विभागीय अधिकाऱ्यांची राहिल, असा इशारा भदाणे यांनी दिला आहे.
१६ धोकेदायक होर्डिंग्ज उतरवले
यापूर्वी एप्रिल २०२३मध्ये नाशिक शहरातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले होते. यासाठी सिव्हिल टेक, संदीप फाऊंडेशन, त्र्यंबकरोड आणि केबीटी महाविद्यालय, गंगापूररोड या तीन एजन्सींची नियुक्ती केली होती. शहरातील ८४५ पैकी तब्बल ६२६ होर्डिंग्जसाठी किरकोळ दुरूस्ती आवश्यक असल्याचे या तपासणीत समोर आले होते. तर १६ अतिधोकेदायक होर्डिंग्ज उतरविण्यात आले होते, असे जाहिरात व परवाने विभागातील सूत्रांनी सांगितले.
बेकायदा होर्डिंग्ज रडारवर
जाहिरात व परवाने विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा होर्डिंग्ज घोटाळा झाल्याचा आरोप नाशिक आऊटडोअर ॲडव्हर्टाईजिंग वेल्फेअर असोसिएशनने काही महिन्यांपुर्वी केला होता. या प्रकरणाच्या चौकशीत काहीअंशी तथ्य आढळले. २८ ठिकाणी होर्डिंग्ज उभारण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली असताना ठेकेदाराने ६३ ठिकाणी होर्डिंग्ज उभारल्याचे समोर आले आहे. या अनधिकृत फलकांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या भूमिककडे लक्ष लागून आहे.
हेही वाचा:
शहराची शोकांतिका ! जिथं जीव गेले तिथंच पुन्हा होर्डिंग, अजून किती बळीची वाट पाहणार?
जळगाव, रावेर दोन्ही लोकसभेत मतदानाचा टक्का वाढला
Gujarat | गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! नर्मदा नदीत एकाच कुटुंबातील ७ जण बुडाले