पाकिस्तानला चर्चा का हवीय?
हेमंत महाजन, ब्रिगेडियर (निवृत्त)
दहशतवाद आणि चर्चा म्हणजेच ‘टेरर अँड टॉक’ एकत्र चालणार नाही, असे सांगत भारताने पाकिस्तानसोबतच्या शांतता चर्चांना पूर्णविराम दिला, त्याला आता बराच काळ लोटला. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पाकिस्तानात सत्तांतरही झाले. आता पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांनी वडील नवाझ शरीफ यांची इच्छा भारताबरोबरचे संबंध मजबूत करायची आहे, असे मत मांडले आहे. पाकिस्तानला अचानकपणाने भारताशी चर्चेची गरज का वाटली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. पाकिस्तानला 24 व्यांदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कर्ज देणार आहे. आयएमएफ असो वा जागतिक बँक असो, कोणत्याही देशाला मदतनिधी किंवा बेलआऊट पॅकेज देताना काही अटी घालते. यामध्ये प्रामुख्याने सदर राष्ट्राने वित्तीय शिस्तीचे पालन केले पाहिजे या अटीसह त्या देशाच्या भूमिका या जागतिक शांततेला छेद देणार्या नसाव्यात हीसुद्धा अपेक्षा असते. त्यामुळेच ‘आयएमएफ’कडून हे कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तान हा आपण एक लोकशाही पाळणारा, मवाळ देश आहोत, असे सिद्ध करण्याचा आटापिटा करत आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराकडून नवाझ शरीफ यांना भारताबरोबर संबंध सुधारण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
मरियम नवाझ शरीफ यांची कर्तारपूर गुरुद्वाराला दिलेली भेट आणि तेथे आलेल्या भारताच्या शीख समुदायाशी केलेली चर्चा याकडे त्या द़ृष्टिकोनातून पाहायला हवे. भारतातील पंजाब राज्यातून शिखांंचा एक जथ्था पाकिस्तानातील कर्तारपूर गुरुद्वारामध्ये बैसाखी हा सण साजरा करायला 18 एप्रिलला गेला होता. त्याचवेळी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या आणि पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांनी या गुरुद्वारामध्ये येऊन या जथ्थ्याशी चर्चा केली.
मरियम यांनी वडील नवाझ यांची इच्छा भारताबरोबरचे संबंध मजबूत करायची आहे, असे जथ्थ्यासमोर सांगितले. त्यांना भारताबरोबरचा व्यापार वाढवून आर्थिक संबंधही द़ृढ करायचे आहेत, असेही त्या म्हणाल्या. मरियम यांनी ही पण आठवण करून दिली की, 2015 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दोन देशांमध्ये संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वर्षी मरियम यांच्या मुलीचे लग्न होते, ज्यासाठी पंतप्रधान मोदी लाहोरमध्ये खास दाखल झाले होते आणि असे वाटत होते की, दोन्ही देशांचे संबंध सुधारतील; परंतु त्यानंतर पुढच्या 10 दिवसांच्या आत पाकिस्तानी सैन्याने जम्मू विमानतळावर ड्रोनचा हल्ला करून दोन्ही देशांमधले संबंध बिघडवले.
पाकिस्तानमध्ये काही विद्वानांचे असे मत आहे की, पाकिस्तानी मुस्लिमांनी पाकिस्तानमध्ये राहणार्या शिखांवर हल्ले करून त्यांना भारतात पाठवायची चूक केली. शिखांचा वापर भारतातील हिंदू आणि शीख यामध्ये दरी निर्माण करण्यासाठी व भारताला तोडण्यासाठी करता आला असता.
मरियम यांनी स्वतःला एक पंजाबी म्हणून समोर आणण्याचा प्रयन करून भारतातील पंजाबच्या जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न केला; परंतु हे नक्की आहे की, नवाझ शरीफ यांचे लक्ष हे काश्मीर मुद्द्यावरून कधीच हटणार नाही. एक कारण असे आहे की, नवाझ शरीफ यांच्या पत्नी एक काश्मिरी भट होत्या.
मुळात पाकिस्तानला भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे कारण म्हणजे आज हा देश भिकेकंगाल झालेला आहे. महागाईने कहर केलेला आहे. पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य यांसह सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. येथील महागाईचा दर 25 टक्क्यांपलीकडे पोहोचला आहे. आशियाई विकास बँकेच्या आकडेवारीनुसार, आशिया खंडातील पाकिस्तान हा राहणीमानाचा खर्च न परवडणार्या देशांत पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही केवळ 1.9 टक्के इतक्या कासवगतीने वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीनेही अलीकडील काळात पाकिस्तानी जनतेला तडाखे दिले आहेत. तिसरीकडे जगभरात हल्ले करण्यासाठी दहशतवादी तयार करणार्या या देशाला आज दहशतवादानेच ग्रासले आहे.
तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेने पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले केले आहेत. इकडे बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीकडून निदर्शने केली जात असून, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पांवर हल्ले केले जात आहेत. चौथा मुद्दा आहे तो ‘आयएमएफ’कडून मिळणार्या कर्जाचा. पाकिस्तानने गेल्या चार वर्षांत हातात कटोरा घेऊन जगभरातील सर्व देशांकडे मदतीची याचना करून झाली आहे; पण आज या देशाला आर्थिक मदत करण्यास कुणीही तयार नाहीये. मध्यंतरीच्या काळात सौदी अरेबियासारख्या देशाने पाकिस्तानला मदत दिली; पण पाकिस्तानची आर्थिक स्थिती फाटक्या झोळीसारखी झाली आहे. वर्षाकाठी काही हजार कोटी रुपये पाकिस्तानला केवळ व्याजापोटीच भरावे लागणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी ‘आयएमएफ’चे कर्ज ही शेवटची आशा आहे.
आज भारत हा केवळ विभागीय महासत्ता म्हणून पुढे आलेला नाहीये, तर त्याचा जागतिक पटलावर प्रभाव टाकणारा एक प्रमुख देश म्हणून उदय झाला आहे. रशिया- युक्रेन युद्धात मध्यस्थी करून ते थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आज जगभरातील अनेक देश भारताला करत आहेत. भारताचा हा वाढलेला करिष्माही पाकिस्तानची भूमिका बदलण्यास कारणीभूत ठरला आहे. भारतातील निवडणुकीनंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारतील का? पाकिस्तान भारताविरुद्धचे आक्रमक धोरण बदलेल का? दहशतवादी निर्माण करायचे कारखाने बंद केले जातील का? पाकिस्तानचे लष्कर खरेच भारताबरोबर शांतता निर्माण करायच्या पक्षामध्ये आहे की पुन्हा मागील काळाप्रमाणे एकीकडे चर्चेची बोलणी करायची आणि दुसरीकडे दहशतवादी हल्ले करायचे याच रणनीतीने पाकिस्तान पुढे जाणार आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाकिस्तानाला आधी द्यावी लागतील. तरीही मरियम यांची कर्तारपूर गुरुद्वासला भेट नक्कीच भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याच्या संबंधात एक महत्त्वाचे पाऊल समजले पाहिजे; कारण हे पाऊल उचलण्यासाठी नवाझ शरीफ, पाकिस्तानचे राजकीय पक्ष आणि सैन्य यांचा त्यांना नक्कीच पाठिंबा असावा.