Loksabha Election | लोकशाहीचा उत्‍सव; पुणेकरांचा हिरिरीने सहभाग

Loksabha Election | लोकशाहीचा उत्‍सव; पुणेकरांचा हिरिरीने सहभाग

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मतदानासाठी लागलेल्या रांगा… फ्लेक्सविरोधात माजी नगरसेवकाचे आंदोलन… तरुणाईसह ज्येष्ठांचाही मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद… चिमुकल्यांकडून मतदानासाठीचा हट्ट… डिजिटल पुरावे दाखवून मतदान करणारी तरुणाई… ज्येष्ठांचा उत्साह… मतदान केंद्र सापडत नसल्याने उडालेला गोंधळ… अशा वातावरणात पुणे लोकसभेसाठी सोमवारी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडले. पेठांमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंत ही परिस्थिती कायम होती.
त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पुन्हा मतदान केंद्रांमध्ये मोठी गर्दी वाढल्याचे दिसून आले. सकाळी सात वाजता सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत दुपारपर्यंत सोसायटी भागात चांगल्या प्रमाणात मतदान झाल्याचे चित्र कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या शनिवार पेठ-सदाशिव पेठ, रास्ता पेठ-रविवार पेठ, खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ हे संपूर्ण, तर कसबा पेठ-सोमवार पेठ, लोहियानगर-कासेवाडी व नवी पेठ-पर्वती या प्रभागातील काही भागांमध्ये बघायला मिळाले. मतदानासाठी आलेले अनेक पालक आपल्या पाल्यांना घेऊन केंद्रावर आले होते. मतदान केंद्रांवर लहान मुलांना आई घेऊन आल्यानंतर बाळांना थोडावेळ विरंगुळा व्हावा म्हणून पाळणाघरांची व्यवस्था केली होती.
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
मतदानाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश मतदारांनी त्यांची पाऊले मतदान केंद्राकडे वळविल्याने सकाळच्या सत्रात शहरातील बहुतांश बाजारपेठा ओस पडल्या होत्या. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, तुळशीबाग परिसर, मंडई परिसर आदी गर्दीची ठिकाणांवर तुरळक गर्दी दिसून येत होती. दुपारी उन्हाच्या कडाक्यामुळे हे चित्र कायम होते.
फ्लेक्सविरोधात उपोषण
कसबा पेठ येथील फडके हौद चौक परिसरातील बूथवर काँग्रेस पक्षाचे फ्लेस लावण्यात आल्याने माजी नगरसेवक हेमंत रासने यांनी आक्षेप घेत बूथसमोर ठिय्या मांडला. आचारसंहितेचा भंग होत असल्याने त्यांनी उपोषणाची भूमिका घेतल्याच्या उपस्थितांना सांगितले. अखेर पोलिस उपआयुक्तांनी फ्लेक्स हटविले.
डिजिटल झाले मतदार
मोबाईल अ‍ॅप तसेच लिंकद्वारे मतदान केंद्र, मतदानाचे ठिकाण आदी माहिती मोबाईलवर मिळवून मतदान केंद्राकडे मार्गस्थ होताना तरुणाई दिसून आली. ई-स्लिपखेरीज ई-आधार कार्ड, ई-वाहन परवाना तसेच ई-मतदार कार्ड दाखवून मतदान करण्यास तरुणाईने प्राधान्य दिले. मतदान स्लिपसाठी गर्दीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
हेही वाचा

Petha : उन्हाळ्यात पेठा खाणे आरोग्यासाठी लाभदायक
शहरात मतदानाचा शेवटचा टप्पा, पावसाच्या टप्प्यात; रस्ते पुन्हा जलमय
रक्त काढून मृत्यूचे नाटक करणारा साप